चित्रपट : जलसा
रेटिंग स्टार : तीन स्टार
परीक्षण : संदीप आडनाईक
'जलसा' (Jalsa) ही हिट अँड रन प्रकरणाची कथा आहे. रुखसाना (शेफाली शाह), तिचा नवरा रिजवान, मुलगी आलिया (कशिश रिजवान) आणि मुलगा इमाद यांच्यासोबत मुंबईत एका झोपडीत राहते. पत्रकार माया मेनन (विद्या बालन) यांच्या घरात तीन वर्षांपासून मोलकरीण म्हणून ती माया, तिची आई (रोहिणी हट्टंगडी) आणि मायाचा मुलगा आयुष (सूर्य काशीभटला) यांच्यासोबत काम करत आहे. ती या कुटुंबातील एक सदस्यच मानली जाते.
एका रात्री मायाला कामावरून उशीर होतो. ती रुखसानाला घरी थांबायला सांगते. तिच्यासोबत राहण्यासाठी इमादला ती जेथे आहे, तेथे बोलावते. ती आलियालाही कॉल करते. मात्र, अभ्यास असल्याचे सांगून ती नकार देते. इकडे रिजवान इमादला मायाकडे सोडतो आणि परत कामावर जातो. इमाद आणि रिझवान निघून गेल्यावर आलिया एका मुलासोबत रात्री उशिरा बाहेर पडते. ती बाहेर असताना अचानक एक कार तिला धडक देऊन लगेच पळून जाते आणि तो मुलगाही. सकाळी आलिया बेशुद्ध अवस्थेत सापडते. गंभीर अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल केले आहे, याचा तपास सुरू होतो. मात्र, गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलीस फारसे उत्सुक नाहीत. पुढे काय होते हा थरार आहे.
प्रज्वल चंद्रशेखर आणि सुरेश त्रिवेणी यांच्या नावीन्यपूर्ण कथेतील ट्विस्ट दर्शकांना गुंतवून ठेवतात. मात्र, काही ठिकाणी कथा अनावश्यकपणे लांबलेली आहे. संवाद फारसे चटपटीत आणि आकर्षक नाहीत. सुरेश त्रिवेणी यांचे दिग्दर्शन मात्र त्यातील वेगळेपणामुळे जाणवते. जलसा एक समांतर शैलीतील चित्रपट आहे. त्यामुळे अनेकदा कंटाळवाणा वाटू शकतो. पहिल्या १५ मिनिटांतील मोठा ट्विस्ट प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो. दुर्दैवाने, १२९ मिनिटांच्या या चित्रपटाची लांबी ही सिनेमाची दुसरी समस्या आहे. क्लायमॅक्स तणावपूर्ण आहे, नाही म्हणायला हा चित्रपट पचायला जड आहे. विद्या बालनने नेहमीप्रमाणे ही आव्हानात्मक भूमिका साकारली आहे. तिला उत्तम साथ देणाऱ्या शेफाली शाहच्या उपस्थितीने चित्रपट उत्कंठापूर्ण होतो.
रोहिणी हट्टंगडी, सूर्य काशीभटला, कशिश रिझवान, मोहम्मद इक्बाल खान (मायाचा बॉस अमन मल्होत्रा), विधात्री बंदी (रोहिणी जॉर्ज), श्रीकांत यादव आणि घनश्याम लालसा (पोलीस), कॅमिओमध्ये मानव कौल, विजय निकम यांच्या सहायक भूमिका उत्कृष्ट आहेत. गौरव चॅटर्जीचे पार्श्वसंगीत प्रभावशाली आहे. सौरभ गोस्वामीच्या सिनेमॅटोग्राफीमुळे प्रभाव वाढतो.