दिग्दर्शक प्रदीप सरकार आणि विद्या बालन ही हिट जोडी पडद्यावर पुन्हा एकदा येण्यास सज्ज झाली आहे. १४ वर्षांपूर्वी प्रदीप सरकार यांच्या परिणितामध्ये विद्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिची ही पहिलीच भूमिका प्रेक्षकांना खूप भावली होती. यामध्ये विद्या आणि सैफ अली खान ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. आता प्रदीप सरकार यांच्या आगामी “नीती बिनोदिनी’मध्ये विद्या दिसणार आहे. या चित्रपटात ती वेश्येची भूमिका बजावणार आहे,
नीती बिनोदिनी हा एक बायोपिक चित्रपट असून १९ व्या दशकातील बिनोदिनी या प्रतिभावान वेश्येला गिरीश चंद्र घोष यांनी थिएटरमध्ये काम करण्याची संधी दिली होती. नाटकात काम करायला लागल्यावर बिनोदिनीने वेश्या व्यवसाय सोडून दिला होता. त्यानंतर जवळ जवळ दशकभर ती कोलकातातील एका प्रसिद्ध थिएटरसाठी नाटकामधून काम करत होती. वेश्या पासून ते एक सुप्रसिद्ध थिएटर अभिनेत्रीपर्यंतचा बिनोदिनीचा प्रवास नीती बिनोदिनीमधून साकारला जाणार आहे. प्रदीप सरकार यांनी या रोलसाठी विद्याला विचारणा केली आहे. विद्याचा आवाज बिनोदिनीच्या रोलसाठी एकदम परफेक्ट आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. हा सिनेमा अमर कथा या बिनोदिनीच्या चरित्रावर आधारलेला असणार आहे.
लवकरच विद्या ‘एनटीआर’ यांच्या बायोपिकमध्येही दिसणार आहे. एन.टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये एन.टी.आर. यांची पत्नी बसवाताराकम यांची भूमिका विद्या साकारताना दिसणार आहे. एनटीआर यांचा मुलगा नंदमुरी बालाकृष्णन चित्रपटात आपल्या वडिलांची भूमिका साकारणार आहे. रवि किशन रामाराव यांच्या जवळच्या मित्राची भूमिका बजावताना दिसणार आहे. तसेच नंदमुरी बालाकृष्णन, विद्या बालन,रवी किशन यांच्यासोबत बाहुबली फेम राणा दुग्गाबत्तीदेखील या बायोपिकमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.