ठळक मुद्देवयाच्या तिस-या वर्षापासून माशृल आर्ट शिकणारा विद्युत कालारीपयात्तुमध्ये निपुण आहे.
बॉलिवूड कुणाचेही नाही....! अभिनेता विद्युत जामवाल याला सध्या याचीच अनुभूती येतेय. विद्युत जामवालला अनेक लोक देशातील सगळ्यांत मोठा अॅक्शन स्टार मानतात. तो स्वत:चे स्टंट स्वत: करतो. जगातील आघाडीच्या सहा मार्शल आर्टिस्टमध्ये विद्युतचे नाव घेतले जाते. त्याच्या किलर बॉडीसमोर जॉन अब्राहमही उणा ठरतो. पण बॉलिवूड मात्र अद्यापही या अभिनेत्याची दखल घ्यायला तयार नाही.
बॉलिवूडमध्ये विद्युतचे नाव सर्वाधिक प्रकाशझोतात आले ते, ‘फोर्स’ या चित्रपटानंतर. जॉन अब्राहम या चित्रपटात लीड रोलमध्ये होता. पण ‘फोर्स’च्या क्लायमॅक्स सीनमध्ये विद्युत भाव खावून गेला होता. बॉलिवूडचा आणखी एक दमदार अॅक्शन स्टार मिळाला, अशीच यानंतर सगळ्यांची भावना झाली होती. पण दुर्दैवाने बॉलिवूडने या अॅक्शन स्टारकडे दुर्लक्ष केले. हेच कारण आहे की, विद्युतला अद्यापही म्हणावे तसे यश मिळू शकले नाही.
वयाच्या तिस-या वर्षापासून माशृल आर्ट शिकणारा विद्युत कालारीपयात्तुमध्ये निपुण आहे. एका जवानाचा मुलगा असलेल्या विद्युतला बॉलिवूडच्या पार्ट्यांना जाणे आवडत नाही. तो कुठल्या बॉलिवूड कॅम्पमध्ये सामील नाही. म्हणायला, विद्युतने अजय देवगण, इमरान हाश्मीसारख्यास्टारसोबत काम केले आहे. पण अद्यापही तिग्मांशू धूलियासारखा दिग्दर्शक सोडला तर अन्य मेनस्ट्रिम फिल्ममेकर त्याला संधी देण्यासाठी मागेपुढे बघतात.
अलीकडे विद्युतचा ‘जंगली’ प्रदर्शित झाला. वन्यप्राणी आणि मानव यांच्या मानवी संबंधावर आधारित या चित्रपटाला समीक्षकांनी दाद दिली. आता बॉक्सआॅफिसवर विद्युतचा हा चित्रपट किती कमाई करतो, यावरच विद्युतचे बॉलिवूडमधील पुढचे करिअर अवलंबून असणार आहे. एकंदर काय तर बॉलिवूडमध्ये बिझनेस महत्त्वाचा आहे, यापेक्षा महत्त्वाचे काहीही नाही, हेच विद्युतच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित होणार आहे.