झी मराठी वाहिनीवरील 'कानाला खडा' या चॅट शोमध्ये संजय मोने कलाकारांशी गप्पा मारतात आणि त्यांच्या आयुष्यातील काही आठवणींना उजाळा देतात. तसंच कलाकारांच्या आयुष्यातील कानाला खडा लावणारे काही किस्से देखील या गप्पांमध्ये रंगतात. हा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि नवनवीन व भन्नाट किस्स्यांमुळे रंगणाऱ्या या मैफिलीने तो अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस देखील पडला.
नुकताच झालेल्या जागतिक महिला दिनाचे औचित्यसाधत तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत या कानाला खंडाच्या मंचावर आल्या होत्या. त्यांनी या मंचाचा पुरेपूर वापर केला आणि दिलखुलासपणे संजय मोने यांच्याशी गप्पा मारल्या. त्यांच्या व्यथा, त्यांचा खडतर प्रवास, समाजाने त्यांची केलेली हेटाळणी, त्यांच्या कुटुंबाची त्यांना नसलेली साथ यासगळ्याबद्दल गौरी यांनी खुलासा केला. या भागाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. संजय मोने यांना देखील हा भाग प्रसारित झाल्यानंतर अनेक लोकांनी अभिप्राय दिला. त्याबद्दल बोलताना संजय मोने म्हणाले, "कानाला खडा हा मंच कलाकारांना त्यांचं मन मोकळं करून देण्यासाठी वाट देतो. गौरी सावंत या खूप खऱ्या आहेत त्यांनी खूप मोकळेपणाने त्यांच्या गोष्टी मांडल्या. त्यामुळे हा भाग पाहिल्यानंतर अनेक जणांचे मला फोन देखील आले अनेकांनी गौरी सावंत यांच्या संस्थेला मदतीचा हात देखील पुढे करण्याची इच्छा दर्शवली. हेच या कार्यक्रमाचं उद्देश आहे आणि ते कुठेतरी सफल होतंय. प्रेक्षकांच्या प्रेमाची पोचपावती मिळतेय. प्रेक्षकांनी असंच प्रेम करत राहावं हीच सदिच्छा."