विजय चव्हाण यांच्या चित्रपट, नाटकातील अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या. मोरूची मावशी या प्रसिद्ध नाटकात त्यांनी अतिशय ताकदीने स्त्री पात्र रंगवलेले होते. या भूमिकेमुळे त्यांना एक वेगळी ओळख मिळाली. विजय चव्हाण यांच्या निधनाला आज एक वर्षं झाले असून ते आज आपल्यात नसले तरी त्यांच्या भूमिका कायमच रसिकांच्या स्मरणात राहाणार आहेत. विजय चव्हाण यांनी त्यांच्या कॉमिक टायमिंगने लोकांना नेहमीच खळखळून हसवले. त्यांच्या सगळ्याच भूमिकांना प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले.
1985 साली प्रदर्शित झालेल्या वहिनीची माया या चित्रपटाद्वारे विजय चव्हाण यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. झपाटलेला, पछाडलेला, भरत आला परत यांसारख्या अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. विजय चव्हाण यांनी 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. मोरूची मावशी, श्रीमंत दामोदर पंत यांसारखी त्यांची अनेक नाटकं प्रचंड गाजली. त्यांना त्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले.
विजय चव्हाण यांच्या पावलावर पाऊल ठेवून सध्या त्यांचा मुलगा वरद चव्हाण अभिनयक्षेत्रात कार्यरत आहे. त्याने आजवर अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. त्याच्या भूमिकांना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. वरदचे काही महिन्यांपूर्वी लग्न झाले. आपल्या मुलाचे लग्न पाहाण्याची विजय चव्हाण यांची शेवटची इच्छा अपुरी राहिली. विजय चव्हाण यांची प्रकृती ढासळत असल्याने आपल्या मुलाचे लग्न आपल्याला पाहाता येणार नाही याची जाणीव त्यांना त्यांच्या निधनाच्या काही दिवसांपूर्वीच झाली होती. आपल्या मुलाचे लग्न आपल्याला पाहाता येणार नाही अशी खंत देखील त्यांनी बोलून देखील दाखवली होती.
वरदचे लग्न प्रज्ञा गुरवशी झाले असून प्रज्ञाचा अभिनयक्षेत्राशी काहीही संबंध नाही. ती कॉर्पोरेट क्षेत्राशी संबंधित आहे. वरद अनेकवेळा त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर त्याच्या कुटुंबियांसोबतचे फोटो पोस्ट करत असतो. विजय चव्हाण यांच्या पत्नीचे म्हणजेच वरदच्या आईचे फोटो देखील आपल्याला वरदच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर पाहायला मिळतात.