विजय चव्हाण यांच्या चित्रपट, नाटकातील अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या. मोरूची मावशी या नाटकात त्यांनी अतिशय ताकदीने स्त्री पात्र रंगवलेले होते. या भूमिकेमुळे त्यांना एक वेगळी ओळख मिळाली. विजय चव्हाण यांच्या निधनाला आज एक वर्षं झाले असून ते आज आपल्यात नसले तरी त्यांच्या भूमिका कायमच रसिकांच्या स्मरणात राहाणार आहेत.
1985 साली प्रदर्शित झालेल्या वहिनीची माया या चित्रपटाद्वारे विजय चव्हाण यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. झपाटलेला, पछाडलेला, भरत आला परत यांसारख्या अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या.
विजय चव्हाण यांनी 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. मोरूची मावशी, श्रीमंत दामोदर पंत ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली. त्यांना त्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले.
मोरूची मावशी हे विजय चव्हाण यांच्या कारकिर्दीतील सगळ्यात गाजलेले नाटक. या नाटकात त्यांनी मोरूची मावशी अप्रतिम रंगवली. हे नाटक त्यांना मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यामुळे मिळाले होते. मोरूची मावशीची भूमिका लक्ष्मीकांत बेर्डे यांनीच स्वीकारावी अशी या नाटकाचे निर्माते सुधीर भट यांची इच्छा होती. दिलीप कोल्हटकर हे या नाटकाचे दिग्दर्शक होते. पण हे नाटक प्रायोगिक रंगभूमीवर विजय चव्हाण सादर करत असत आणि हे नाटक लक्ष्मीकांत यांनी पाहिले होते. त्यामुळे या नाटकातील मोरूची मावशी या भूमिकेसाठी विजय चव्हाणच योग्य असल्याचे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी निर्मात्यांना सांगितले होते.
विजय चव्हाण यांना मिळालेल्या या संधीचे त्यांनी सोने केले असेच म्हणावे लागेल. मोरूची मावशी ही भूमिका त्यांनी इतक्या चांगल्याप्रकारे साकारली की लक्ष्मीकांत यांचे म्हणणे अगदी योग्य असल्याचे त्यांनी सिद्ध केले. या नाटकातील त्यांचा अभिनय, त्यांचा वावर, 'टांग टिंग टिंगा' या गाण्यावरचे नृत्य या गोष्टींना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. या नाटकाचे अनेक प्रयोग झाले. या नाटकातील 'टांग टिंग टिंगा' या गाण्याला तर प्रेक्षकांचा आवर्जून वन्स मोअर मिळत असे.