Join us

Vijay vadettiwar: गुडन्यूज! OBC विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 2 वसतिगृहे, सरकारची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 7:02 PM

राज्यातील इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे बांधण्याच्या संदर्भाने सदस्य समाधान अवताडे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देतांना मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले

मुंबई - राज्यातील इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात दोन याप्रमाणे ७२ वसतीगृहे सुरु करण्यात येणार असून या वसतीगृहांचा प्रस्ताव वित्त विभागाच्या मान्यतेनंतर मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल, असे इतर मागास बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत सांगितले. सध्या, राज्यातील ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा गाजत असून शासनाने ओबीसींना राजकीय आरक्षण परत मिळावे, यासाठी निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी विधेयक मंजूर केलं आहे. 

राज्यातील इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे बांधण्याच्या संदर्भाने सदस्य समाधान अवताडे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देतांना मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या बाबू जगजीवनराम छात्र आवास योजनेतून मिळणाऱ्या अर्थसहाय्यातून राज्यातील इतर मागासवर्गातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींसाठी प्रत्येकी १८ प्रमाणे ३६ वसतीगृहे सुरु करण्याचा निर्णय ३० जानेवारी २०१९ च्या शासन निर्णयान्वये शासनाने घेतला होता. या योजनेंतर्गतच्या वसतीगृहांसाठी जमीन उपलब्ध झालेल्या नागपूर, अहमदनगर, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचे प्रस्ताव केंद्राकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आले, त्यांनी काढलेल्या त्रुटींची देखील पूर्तता करण्यात आली असली तरी केंद्राने अद्याप या प्रस्तावांना मान्यता दिलेली नाही. 

चार जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये जागा किंवा इमारतींच्या उपलब्धतेविषयी जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. दरम्यान, राज्य शासनाने ७२ वसतीगृहे बांधण्याची घोषणा केली असून हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मान्यतेसाठी सादर करण्यात येणार असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

टॅग्स :विजय वडेट्टीवारमुंबईविद्यार्थी