कंगनाच्या (kangana ranaut) स्वातंत्र्यासंदर्भातील विधानाचं समर्थन केल्यापासून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (vikram gokhale) चांगलेच चर्चेत आले आहेत. सामान्यांपासून राजकीय व्यक्तीमत्त्वांपर्यंत अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका केली आहे. यात काही मराठी कलाकारांनीही त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, अभिनेता योगेश सोमण (yogesh soman) यांनी याविषयी व्यक्त होण्यास नकार दिला आहे. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. "विक्रम गोखलेंवर बोलणार नाही", असं म्हणत त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.
अभिनेता योगेश सोमण हे अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणा आणि परखडपणा यामुळे ओळखले जातात. समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर ते उघडपणे व्यक्त होत असतात. परंतु, यावेळी त्यांनी विक्रम गोखलेंविषयी व्यक्त होण्यास नकार दिला आहे. अलिकडेच टिळक रस्ता येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात एक प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात योगेश सोमण यांना विक्रम गोखलेंविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. मात्र, त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला.
"परखडपणे आणि स्पष्टपणे व्यक्त होता आलं पाहिजे. आपले विचार आग्रहाने मांडता आले पाहिजे. पण, आज मी इथे विक्रम गोखलेंवर बोलणार नाही", असं योगेश सोमण म्हणाले.
दरम्यान, या कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी कव्यसंग्रह, कविता अशा विविध साहित्य विषयांवर चर्चा केली. त्यांची मत मांडली. योगेश सोमण हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहेत. आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सर्जिकल स्ट्राइकवर आधारित ‘उरी’ या चित्रपटात योगेश सोमण यांनी तत्कालीन केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची भूमिका साकारली होती.