Join us

Vikram Gokhale Passed Away : विक्रम गोखलेंच्या निधनाने मराठी कलाकार हळहळले, सोशल मीडियावर वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 6:47 PM

Vikram Gokhale Passed Away : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वयाच्या ७७ वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे निधन झाले आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वयाच्या ७७ वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या २० दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विक्रम गोखलेंच्या निधनाच्या बातमीने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय. मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत विक्रम गोखलेंच्या निधनाने शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर विक्रम गोखलेंना श्रद्धांजली वाहिली आहे. 

अभिनेते आणि राजकिय व्यक्तीमत्त्व असलेल्या अमोल कोल्हे विक्रम गोखलेंना श्रद्धांजली वाहताना भावूक झालेले दिसून आले. विक्रम गोखलेंचा फोटो शेअर करत अमोल कोल्हे यांनी ट्विट केले की, "विक्रम काका, तुमची उणीव भासत राहिल... जेव्हा जेव्हा कुणी अभिनेता कॅमेराला डबल लूक देईल, जेव्हा जेव्हा फक्त देहबोलीतून पानभर संवाद बोलला जाईल, जेव्हा जेव्हा घेतलेल्या पॉजमधूनही अचूक अर्थ पोहचवला जाईल, जेव्हा जेव्हा एन्ट्रीच्या थाटावरून पात्राची पूर्ण पार्श्वभूमी उभी राहिल, जेव्हा जेव्हा बिटविन द लाईन संवादापेक्षा अधोरेखित होईल... भूमिका घ्यायला कचरण्याच्या काळात निर्भीड भूमिका मांडली जाईल... तेव्हा तेव्हा विक्रमकाका, तुमची उणीव भासत राहिली..." 

गायिका केतकी माटेगांवकर हिनेही विक्रम गोखलेंना श्रद्धांजली वाहिली आहे. सोशल मीडियावर त्यांच्यासोबतचा फोटो शेअर करत म्हटले की, आज खूप दुःख झालं. विक्रम काका, आपल्या इंडस्ट्रीला लाभलेले एक अतुलनीय अभिनेते, उत्कट कलाकार आणि अतिशय चैतन्य असलेले व्यक्ती. त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताबद्दलही खूप चांगले ज्ञान होते. काही क्षण मला त्याच्यासोबत 'दुसरी बाजू'मध्ये शेअर करायला मिळाले. काका, तुमची आठवण येईल. तुमचे मार्गदर्शन माझ्यासाठी नेहमीच मौल्यवान असेल. तुमच्या आत्म्याला शांती लाभो." 

अभिनेत्री अश्विनी भावे यांनी विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर विक्रम गोखलेंसोबतचे काही फोटो शेअर केले आणि लिहिले की, आज आपण एक अद्वितीय अभिनेता आणि एक सह्रीदयी माणूस गमावला. त्यांच्या जाण्याने कला क्षेत्राचे खूप मोठं नुकसान झाले आहे ,जे कधीही भरून काढता येणार नाही. विक्रम गोखले म्हणजे आमच्या पिढीसाठी अभिनयाची शाळाच होती. माझ्या करिअरमधील तीन उत्तम आणि गाजलेल्या कलाकृतींमध्ये (पार्टनर मालिका, कळत नकळत आणि वजीर सिनेमा) विक्रमजींसोबत काम करण्याची संधी मला मिळाली.त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या. त्यांच्या अनेक आठवणी कायम माझ्यासोबत असतील! We will miss you..." 

अभिनेत्या सुकन्या मोने यांनी टिव्हीवरील विक्रम गोखलेंच्या निधनाच्या बातमीचा फोटो शेअर करत दुखः व्यक्त केले आहे.

अभिनेता कुशल बद्रिकेने विक्रम गोखलेंचा फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिलीये. कुशलने विक्रम गोखले यांचा ते तरुण असतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.  अभिनेत्री समृद्धी केळकर हिनेही विक्रम यांच्या निधनाची एक पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

टॅग्स :विक्रम गोखले