मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे शनिवारी निधन झाले आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वयाच्या ७७ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या २० दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्यामुळे बॉलिवूडसह मराठी सिनेइंडस्ट्रीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आज संध्याकाळी सव्वा सहा वाजता पुण्यातील वैंकुठभूमी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मराठी सिनेइंडस्ट्री, नाटक, साहित्य आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते.
गेल्या २० दिवसांपासून विक्रम गोखले रुग्णालयात दाखल होते. बुधवारपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. यादरम्यान त्यांच्या मृत्यूची अफवाही उठली होती, ज्याचे कुटुंबीयांनी खंडन केले होते. शुक्रवारी त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली होती, मात्र अनेक अवयव निकामी झाल्यामुळे शनिवारी दुपारी त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव पुण्यातील बाल गंधर्व रंगमंदिरात ठेवण्यात आले, त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबाव्यतिरिक्त काही जवळचे लोकही उपस्थित होते. यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. यात दीपा लागू, किशोर कदम, प्रवीण तरडे, मिलिंद शिंत्रे, मिलिंद दास्ताने, राजेश दामले, मेघराज राजेभोसले, गिरीश परदेशी, जब्बार पटेल, मल्हार पाटेकर ही मान्यवर मंडळी अंतिम दर्शनासाठी पोहचले होते.
विक्रम गोखले मालिका,नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात कार्यरत होते. विक्रम गोखले यांना घरातूनच अभिनयाचा वारसा मिळाला होता. त्यांनी इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले होते. विक्रम गोखले यांची महत्त्वाची भूमिका असलेला गोदावरी हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला. अनेक वर्षांनंतर ते हल्लीच छोट्या पडद्यावरील 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत दिसले होते.