ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - बॉलिवूडची मस्तानी दीपिका पडूकोण हॉलिवूडमध्ये पदार्पण करत असून हॉलिवूड स्टार विन डिझेल सोबतचा तिचा पहिला चित्रपट 'ट्रिपल एक्सः द रिटर्न ऑफ झेंडर केज’ उद्या , १४ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र त्यापूर्वी काल संध्याकाळी सिनेसृष्टीतील ता-यांसाठी मुंबईत चित्रपटाचा ग्रँड प्रिमीअर पार पडला. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विन डिझेल भारतात आला असून काल त्याने दीपिकासह 'लुंगी डान्स' या प्रसिद्ध गाण्यावर नृत्यही केले. या प्रिमिअरसाठी दीपिकाचा बॉयफ्रेंड अभिनेता रणवीर सिंग, शाहिद कपूर, शबाना आझमी, इरफान खान, करण जोहर, हुमा कुरैशी, कल्कि कोचलीन, रिचा चढ्ढा आदी कलाकारही उपस्थित होते. आपल्या प्रेयसीला मिळणारा हा मान पाहून रणवीरही खूप खुश होता.
प्रीमिअरपूर्वी दोघांनी चाहत्यांची भेटही घेतली. सोनेरी रंगाच्या बोल्ड गाऊनमध्ये दीपिकाचे सौंदर्य खुलून दिसत होते. यावेळी तिने तिच्या काही गाण्यांवर नृत्यही केले. तर ' लुंगी डान्स' या गाण्यासठी तिने चक्क विन डिझेललाच लुंगी नेसवली आणि आपल्या तावर नाचवलेही.
गुरूवारी सकाळी विन डिझेलचे भारतात आगमन झाले. मुंबई विमानतळावर मराठमोळ्या पद्धतीने त्याचे स्वागतही करण्यात आले. हा चित्रपट सर्वप्रथम भारतात प्रदर्शित होत असून २० जानेवारीला हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होईल. या चित्रपटात दीपिकाने सेरेना उंगरची भूमिका साकारली असून तिच्यासह डोनी येन, निना डोबेरव्ह, रूबी रोज आणि सॅम्युअल एल.जॅक्सन हे कलाकारही चित्रपटात झळकणार आहेत.