Join us

विनोद खन्ना पंचत्वात विलीन

By admin | Published: April 27, 2017 12:05 PM

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते विनोद खन्ना यांच्यावर गुरुवारी संध्याकाळी वरळीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 27 - बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते विनोद खन्ना यांच्यावर गुरुवारी संध्याकाळी वरळीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अभिनेते अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, सुभाष घई यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज स्मशानभूमीत उपस्थित होते. 

गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाने आजारी असलेल्या विनोद खन्ना यांनी आज सकाळी 11.20च्या सुमारास सर एचएन रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते 70 वर्षांचे होते. आपल्या 45 वर्षांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीत त्यांनी एकूण 141 चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. यशस्वी नायक ते यशस्वी राजकारणी असा त्यांचा प्रवास होता. रुपेरी पडद्यावर नाव, प्रसिद्धी यश कमावल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. राजकारणातही त्यांनी तितकेच यश मिळवले. वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय मंत्रीपदही भूषवले. 
 

काही दिवसांपूर्वी शरीरातील पाणी कमी झाल्याच्या कारणामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी गिरगावातील एचएन रिलायन्स फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. यादरम्यान, त्यांचा हॉस्पिटलमधील फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता. यात फोटोमध्ये विनोद खन्ना त्यांना ओळखणंही कठीण झाले होते. आरोग्य तपासणीदरम्यान त्यांना मूत्रपिंडाचा कॅन्सर असल्याचे निष्पन्न झाले होते 

विनोद खन्ना यांनी "मेरे अपने", "कुर्बानी", "पूरब और पश्चिम", "रेशमा और शेरा", "हाथ की सफाई", "हेरा फेरी", "मुकद्दर का सिकंदर" यांसारखे अनेक शानदार सिनेमे इंडस्ट्रीला दिले आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांनी खलनायकाच्या भूमिका केल्या मात्र यानंतर त्यांना मुख्य नायकाचे सिनेमे मिळत गेले.
 
विनोद खन्ना यांनी 1968मध्ये "मन का मीत" या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. तर शाहरुख खान आणि वरुण धवन यांच्यासोबत "दिलवाले" या सिनेमात ते शेवटचे दिसले होते. 

 

(विनोद खन्नांचा फोटो पाहून इरफानला धक्का, गरज पडल्यास करणार अवयवदान)

ज्यावेळी विनोद खन्ना यांचा हॉस्पिटलमधील व्हायरल फोटो बॉलिवूड अभिनेता इरफान खानला धक्का बसला होता. "जर विनोद खन्ना यांच्यावर उपचार करण्यासाठी माझ्या शरीरातील एखादा अवयव दान करण्याची गरज भासली तर आपण त्यासाठी तयार आहोत", अशी भावना इरफाननं व्यक्त केली होती.