मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अजय देवगण याचं हेलिकॉप्टर महाबळेश्वरमध्ये क्रॅश झाल्याची माहिती सोशल मीडियात व्हायरल होत आहे. पण व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेली ही माहिती चुकीची असल्याचं उघड झालं आहे. आणि अजय देवगण सुरक्षित आहे.
महाबळेश्वरमधील पोलिसांनी अजय देवगणबाबतच्या या खोट्या बातमीचा पर्दाफाश केलाय. पोलिसांनी माहिती दिली की, अभिनेत्याबद्दल जे मेसेज व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत आहेत, ते खोटे आहेत. आम्ही हे मेसेज कुठून येणे सुरु झाले याचा तपास करत आहे.
महाबळेश्वरमधील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, अजय देवगणचं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याच्या बातमीत सत्यता असती तर सर्वातआधी आम्हाला माहिती मिळाली असती. पण चौकशी केल्यावर असं काहीच घडलं नसल्याचं समोर आलंय.
दरम्यान, सोशल मीडियात नेहमीच सेलिब्रिटींबद्दल अशा खोट्या बातम्या येत असतात. कधी कुणाच्या निधनाच्या बातम्या तर कधी कुणाच्या आजाराच्या खोट्या बातम्या व्हायरल होत असतात. याचं ताजं उदाहरण म्हणजे अभिनेता इंदर कुमार याचा व्हिडीओ.