Join us

Dhanashree Yuzvendra Chahal, Video: पतिराजांचे काही खरं नाही! धनश्रीसाठी युजवेंद्र चहल झाला 'कुली'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 1:00 PM

धनश्री आणि युजवेंद्र चहल भारतीय संघासोबत प्रवास करतानाचा व्हिडीओ शिखर धवनने शेअर केला.

Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma, Video: शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध वन डे मालिका खेळत आहे. तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. त्यापैकी न्यूझीलंडने पहिला सामना जिंकला आहे, तर दुसऱ्या सामन्यात कोणताही निकाल लागला नाही. आता तिसरा सामना ख्राइस्टचर्च येथे ३० नोव्हेंबर (बुधवार) रोजी होणार आहे. त्यात भारतीय संघ सामना जिंकून मालिका १-१ अशी वाचवू शकतो. याचदरम्यान धनश्री आणि युजवेंद्र चहल यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

धवनने शेअर केला एक मजेदार व्हिडिओ-

तिसऱ्या वन डे सामन्यापूर्वी टीम इंडिया रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहे. कॅप्टन शिखर धवनने त्याच्या इंस्टाग्रामवर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये लेग-स्पिनर युजवेंद्र चहल एकाचवेळी ४-४ बॅगा घेऊन जाताना दिसत आहे. तर चहलची पत्नी फक्त एक बॅग घेऊन पुढे जात आहे. धवन व्हिडिओमध्ये रिपोर्टरच्या भूमिकेत म्हणतो की, 'युजीचे (युजवेंद्र चहलचे सत्य उघड झाले! हे बघा, युजी आता कुली झाला आहेत. एखादी व्यक्ती किती सामान घेऊन जाते, हे तुम्हाला इथे दिसेल.'

दरम्यान, धनश्री वर्माही मागून येते. तिच्याकडे बघत धवन विचारतो की तुला चहलबद्दल काय म्हणायचे आहे. धनश्री म्हणते की तिचा पाय खूप दुखतो म्हणून युजी बॅगा घेऊन चाललाय. नाहीतर सगळ्या जगाचा भार तिला एकटीलाच उचलावा लागला असता. त्यानंतर धवनने विचारले, 'आमच्या या छोट्याशा मित्राचे काय? त्यावर धनश्री म्हणाली, 'तुमच्या छोटाशा मित्राला आणखी खंबीर होऊ द्या.' शेवटी धवन चहलला, 'वेल डन' म्हणतो. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात धवनने ७२ धावांची शानदार खेळी करून आपला दर्जा दाखवून दिला. मात्र, दुसऱ्या वनडेत धवन काही विशेष करू शकला नाही आणि अवघ्या तीन धावा करून बाद झाला. धवनला शेवटच्या वनडेत मोठी खेळी खेळायला आवडेल. शिखर धवन खेळाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या पोस्टमुळेही चर्चेत राहतो. यादरम्यान धवन फनी मीम्स आणि रील्सद्वारे आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. तर दुसरीकडे, युझवेंद्र चहलबद्दल बोलायचे तर तो पहिल्या वनडेत खूप महागडा ठरला होता. त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. तर दुसऱ्या वन डे मध्ये भारताला गोलंदाजीच मिळाली नव्हती.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडयुजवेंद्र चहलशिखर धवनसोशल मीडिया