Virat Kohli Anushka Sharma Rental flat: भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच चर्चेत असतात. कधी वैयक्तिक आयुष्य तर कधी व्यावसायिक अपडेट्स यामुळे त्यांच्या कायम काही ना काही बातम्या येतच असतात. या दरम्यान, या जोडप्याशी संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक असलेल्या 'विरूष्का' जोडीने मुंबईतील जुहू येथे एक फ्लॅट चक्क भाड्याने घेतला आहे. विशेष म्हणजे, या फ्लॅटचे भाडेदेखील लाखोंच्या घरातच आहे. या फ्लॅटचे भाडे किती आहे, डिपॉझिट किती आहे आणि हा फ्लॅट किती मोठा आहे, हे सारं काही जाणून घेऊया.
माजी क्रिकेटपटूचा फ्लॅट, भाडे लाखांच्या घरात
सेलेब्स अनेकदा त्यांच्या लाईफस्टाईलबद्दलही चर्चेत असतात. याच दरम्यान, विराट-अनुष्काने मुंबईतील जुहू येथे फ्लॅट भाड्याने घेतला आहे आणि त्यासाठी ते लाखोंच्या घरात दर महिना भाडेही देणार आहेत. Zapkey.com च्या रिपोर्टनुसार, हा फ्लॅट 'हाय टाइड' इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आहे. विरूष्का या फ्लॅटचे महिन्याचे भाडे २.७६ लाख रुपये देत आहेत. इतकेच नव्हे तर जोडप्याने तब्बल ७.५० लाख रुपये डिपॉझिटदेखील दिले आहे. एका रिपोर्टनुसार, हा फ्लॅट १,६५० स्क्वेअर फूटांचा आहे. पण फ्लॅट सी-फेसिंग (Sea Facing) आहे. घरातूनच समुद्र दिसत असल्याने फ्लॅटचे भाडे जास्त आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, हा फ्लॅट माजी क्रिकेटर समरजित सिंग गायकवाड यांचा आहे.
---
अनुष्का 'चकडा एक्सप्रेस'मधून करणार पुनरागमन
अनुष्का शर्माची शेवटची फिल्म २०१८ साली प्रदर्शित झाली होती. झिरो या चित्रपटात ती दिसली होती. या चित्रपटात अनुष्कासोबत कतरिना कैफ आणि शाहरुख खानही होते. आता तीन-चार वर्षांच्या अंतरानंतर अनुष्का लवकरच 'चकडा एक्सप्रेस'मध्ये दिसणार आहे. भारतीय क्रिकेटपटू झुलन गोस्वामी हिच्या जीवनावर आधारित असा हा स्पोर्ट्स बायोपिक चित्रपट आहे. अनुष्का शर्माच्या सिने करिअरबद्दल सांगायचे तर तिने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अनुष्काने रब ने बना दी जोडी, बँड बाजा बारात, पीके, सुलतान, ए दिल है मुश्किल, संजू, जब तक है जान अशा हिट चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.