दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा आगामी 'द दिल्ली फाइल्स' (The Delhi Files) चा टीझर समोर आला आहे. आज प्रजासत्ताक दिनी मेकर्सने सिनेमाचा टीझर देशवासियांसाठी आणला आहे. काश्मीर फाईल्सनंतर आता दिल्ली फाईल्समधून इतिहासातील कोणत्या घटनेवर बोट ठेवण्यात आलं आहे याची सर्वांनाच उत्सुकता आहे. 'द दिल्ली फाइल्स' द बंगाल चॅप्टर असं त्याचं सबटायटलही आहे.
टीझरमध्ये आपल्याला अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) दिसतात. २ मिनीट २१ सेकंदांचा हा टीझर आहे त्यांचा लूक यामधून समोर आला आहे. एका कॉरिडॉरमधून ते कॅमेऱ्याच्या दिशेने हळूहळू चालत भारतीय संविधानाच्या ओळी म्हणत येत असतात. वृद्ध, थकलेले शरीर, अंगावर शाल पण डोळ्यात धगधगती आग असा त्यांचा दमदार लूक दिसत आहे. बंगालमधील हिंदू नससंहारवर सिनेमा आधारित आहे.
द दिल्ली फाईल्स या वर्षी स्वातंत्रदिनाच्या मुहुर्तावर रिलीज होणार आहे. टीझरने आतापासूनच उत्सुकता वाढवली आहे. दरम्यान यावर काही युजर्सने कमेंट करत लिहिले, 'आणखी एक प्रोपगंडा','टीझर इंटरेस्टिंग आहे, बघायला लागेल','दिग्दर्शकाला सल्ला आहे की अशा विषयांवर सिनेमा बनवण्यापेक्षा सीरिजच घेऊन या. सीरिजमध्ये जास्त वाव मिळतो.'
विवेक अग्निहोत्री यांचा याआधी 'द व्हॅक्सीन वॉर' रिलीज झाला होता. सिनेमाला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. आता 'द दिल्ली फाइल्स' मध्ये मिथुन चक्रवर्ती यांच्याशिवाय अनुपम खेर, पलल्वी जोशी, दर्शन कुमार, सिमरत कौर यांची भूमिका आहे. १५ ऑगस्ट २०२५ रोजी सिनेमा रिलीज होणार आहे.