तर विवेक ओबेरॉय या मतदारसंघातून लढवणार निवडणूक!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 11:37 AM2019-04-07T11:37:44+5:302019-04-07T11:38:05+5:30
अभिनेता विवेक ओबेरॉय सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकमध्ये बिझी आहे. यात विवेक नरेंद्र मोदी यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे आणि या व्यक्तिरेखेचा प्रभाव म्हणा की आणखी काही विवेकला आता राजकारण खुणावू लागले आहे.
अभिनेता विवेक ओबेरॉय सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकमध्ये बिझी आहे. यात विवेक नरेंद्र मोदी यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे आणि या व्यक्तिरेखेचा प्रभाव म्हणा की आणखी काही विवेकला आता राजकारण खुणावू लागले आहे. होय, पुढे मागे राजकारणात सामील होण्याची इच्छा विवेकने बोलून दाखवली आहे. केवळ इतकेच नाही तर कुठल्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची, हेही विवेकने ठरवून टाकले आहे.
होय, गुजरातेतील वडोदरा येथे ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये विवेकला राजकारणात सामील होण्याबद्दल विचारण्यात आले. यावर मी राजकारणात आलोच तर २०२४ मध्ये वडोदरा (बडोदा)मधून लोकसभा निवडणूक लढवण्याची माझी इच्छा असेल, असे विवेक म्हणाला. वडोदरातील लोकांनी पीएम नरेंद्र मोदी यांना भरभरून पाठींबा दिला आहे. त्यामुळे मी याच मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छितो, असेही तो म्हणाला.
‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकनंतर भाजपाने विवेक ओबेरॉयला एक मोठी जबाबदारी दिल्याची चर्चा आहे. या चर्चेनुसार, भाजपाने अलीकडे गुजरात लोकसभा निवडणूक प्रचारकांची आपली यादी जाहीर केली. या यादीत विवेकचे नाव असल्याचे कळतेय.
‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट भारतासह जगभरातील ३८ देशांत प्रदर्शित होतोय. आधी हा चित्रपट ५ एप्रिलला प्रदर्शित होणार होता.पण प्रदर्शनाच्या ऐन तोंडावर ही रिलीज डेट बदलण्यात आली. आता ‘पीएम नरेंद्र मोदी’ ५ एप्रिलऐवजी १२ एप्रिलला रिलीज होणार आहे.