Join us

मोदींसोबत सेल्फी घेणा-या स्टार्सला विवेक ओबेरॉयचा टोमणा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 2:42 PM

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय सध्या ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकमुळे चर्चेत आहे. विवेकचा हा आगामी सिनेमा सुरुवातीपासूनच वादात साडपलाय आणि आता निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली आहे. साहजिकच, या सगळ्यांमुळे विवेक संतापला आहे.

ठळक मुद्दे  प्रदर्शनाच्या एक दिवस आधी निवडणूक आयोगाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली. त्यामुळे हा चित्रपट ११ एप्रिलला प्रदर्शित होऊ शकला नाही.

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय सध्या ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकमुळे चर्चेत आहे. विवेकचा हा आगामी सिनेमा सुरुवातीपासूनच वादात साडपलाय आणि आता निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली आहे. साहजिकच, या सगळ्यांमुळे विवेक संतापला आहे.  इतका की, बॉलिवूडच्या कलाकारांचाच त्याने क्लास घेतला.  ‘पीएम नरेंद्र मोदी’ निर्विघ्न प्रदर्शित व्हावा म्हणून, विवेकने एकट्याने लढाई लढली. पण त्याच्या समर्थनार्थ बॉलिवूडचा एकही कलाकार समोर आला नाही. ही गोष्ट विवेकला चांगलीच खटकली आणि त्याने बॉलिवूडच्या अनेकांना जोरदार टोमणा मारला. ‘पीएम नरेंद्र मोदी यांच्यासोबत सेल्फी घ्यायला सगळे समोर येतात. पण त्यांच्यावर बेतलेल्या चित्रपटाच्या बाजूने मात्र कुणीही उभे राहिले नाही’, असे विवेक म्हणाला. ही इंडस्ट्री कुणाचीही नाही. इथे कुठेच एैक्य नाही. भन्साळींचा ‘पद्मावत’ असो की शाहरुखचा ‘माय नेम इज खान’ अशा चित्रपटांना पाठींबा देण्यासाठी एकही कलाकार समोर आला नाही, असेही विवेक म्हणाला.

त्याचा हा टोमणा, रणवीर सिंग, रणबीर कपूर, विकी कौशल, वरूण धवन, करण जोहर, रोहित शेट्टी, एकता कपूर अशा सगळ्यांसाठी होता. अलीकडे या सगळ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती आणि त्यांच्यासोबतचा सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामुळे विवेकच्या या टोमण्याचा बॉलिवूडवर किती परिणाम होतो आणि हे स्टार्स त्यावर काय उत्तर देतात, ते बघूच.

‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकमध्ये विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत आहे. तीन दिवसांपूर्वी ‘पीएम नरेंद्र मोदी’चे प्रदर्शन थांबवण्याची विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती आणि यासंदर्भातील निर्णय निवडणूक आयोगावर सोपवला होता. ‘पीएम नरेंद्र मोदी’ येत्या ११ एप्रिलला प्रदर्शित झाल्यास आचारसंहितेचे उल्लंघन ठरेल काय?  याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल, असे सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावताना स्पष्ट केले होते. त्यानुसार,  प्रदर्शनाच्या एक दिवस आधी निवडणूक आयोगाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली. त्यामुळे हा चित्रपट ११ एप्रिलला प्रदर्शित होऊ शकला नाही. आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकेल. 

टॅग्स :विवेक ऑबेरॉयपी. एम. नरेंद्र मोदी