शाहरुख खान (Shahrukh Khan) बस नाम ही काफी है. बॉलिवूडचा किंग अशी त्याची ओळख आहे. कोणताही गॉडफादर नसताना त्याने फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. त्याच्या करिअरच्या सुरुवातीला अनेकांनी त्याला मदत केली. त्यापैकीच एक विवेक वासवानी (Vivek Vawani). त्यांनीच शाहरुखला 'राजू बन गया जेंटलमन' मध्ये ब्रेक दिला होता. विवेक यांनी नुकतंच दिलेल्या मुलाखतीत शाहरुखविषयी अनेक खुलासे केले. तसंच त्याच्यासोबतच्या मैत्रीचेही अनेक किस्से सांगितले.
विवेक वासवानी हे हिंदी सिनेमातील जुने कलाकार आहेत. शाहरुख त्याच्या स्ट्रगलच्या काळात विवेक वासवानींच्या घरी राहिला होता. तेव्हा शाहरुखला करिअरचं टेन्शन होतं, त्याला गौरीशी लग्नही करायचं होतं. विवेक यांनी तर शाहरुखला साथ दिली मात्र जेव्हा ते स्वत: कॅन्सरशी लढा देत होते तेव्हा मात्र त्यांनी शाहरुखची मदत घेतली नाही. इतकंच नाही तर चार वर्ष ते एकमेकांच्या संपर्कातही नव्हते. सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत विवेक वासवानी म्हणाले, "आम्ही एकमेकांशी बोलत नाही भेटतही नाही. पण जेव्हा समोरासमोर येतो तेव्हा असं वाटतं की फार वर्ष झालीच नाहीत. मी एक शिक्षक आहे, शाळेचा डीन आहे. मी रोज १८ तास काम करतो, बस, लोकलने प्रवास करतो. तर शाहरुख एक सुपरस्टार आहे."
ते पुढे म्हणाले, "शाहरुखकडे १७ फोन आहेत. माझ्याजवळ त्याचा एकच नंबर आहे. जर त्याने फोन उचलला तरच मी त्याच्याशी बोलू शकतो. जवान सिनेमानंतर मी त्याला फोन केला होता पण त्याने उचलला नाही. जेव्हा मी अंघोळीला गेलो तेव्हा त्याचा फोन आला तो मी उचलला नाही. तो कायम प्रवासातच असतो. त्याच्याही काही जबाबदाऱ्या आहेत. तो अख्खं साम्राज्य चालवतो. म्हणून मीही मनाला लावून घेत नाही."
विवेक वासवानी यांनी शाहरुखसोबत शेवटचं 'दूल्हा मिल गया' मध्ये काम केलं होतं. ते दोघं भलेही भेटू शकत नसतील पण त्यांना एकमेकांची तितकीच काळजी आहे. आता विवेक यांना सुहाना खानसोबत काम करण्याची इच्छा आहे.