- Prajakta Chitnis
‘शक्ती... अस्तित्व के एहसास की’ या मालिकेत रुबिना दिलाईक तृतीयपंथीयाची भूमिका साकारत आहे. कोणत्याही मालिकेत कलाकाराने तृतीयपंथीयाची भूमिका साकारण्याची ही पहिलीच वेळ आहे. तिच्या या भूमिकेबाबत तिच्याशी मारलेल्या गप्पा...रुबिना तुझ्या छोटी बहू, पुनर्विवाह-एक नई उम्मीद यांसारख्या अनेक मालिका गाजल्या आहेत. पुनर्विवाहानंतर तू तीन वर्षांचा ब्रेक का घेतला होतास?मी आतापर्यंत नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याच त्याच प्रकारच्या भूमिका साकारणे मला पटत नाही. त्यामुळेच मी एखाद्या चांगल्या भूमिकेची वाट पाहात होती. मला या दरम्यान अनेक मालिकांच्या आॅफरदेखील येत होत्या. पण चांगली भूमिका असल्याशिवाय छोट्या पडद्यावर परतायचे नाही असे मी ठरवले होते. शक्ती... अस्तित्व के एहसास की या मालिकेत तू एका तृतीयपंथीयाची भूमिका साकारत आहेस. ही भूमिका आॅफर झाल्यानंतर ही भूमिका कशाप्रकारे साकारायची याचे काही दडपण आले होते का?माझ्याआधी या भूमिकेसाठी अनेक अभिनेत्रींना विचारण्यात आले होते. पण या भूमिकेसाठी कोणीच तयार नव्हते. एक कलाकार म्हणून तुम्ही रिस्क घेणे गरजेचे असते. त्यामुळेच मी ही भूमिका स्वीकारली. ही भूमिका साकारण्यासाठी माझ्या टीमने मला खूप मदत केली. आज माझ्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे याचा मला खूप आनंद होत आहे. आपल्या समाजात तृतीयपंथीयांना जी वागणूक दिली जाते, त्याबाबत तुझे काय म्हणणे आहे?प्रत्येक व्यक्तीला समान वागणूक देणे गरजेचे आहे असे मला नेहमी वाटते. आपल्याला मिळणारे सगळे हक्क आणि अधिकार तृतीयपंथीयांनादेखील मिळाले पाहिजेत. आमची मालिका सुरू झाल्यानंतर अनेक तृतीयपंथीय मालिकेच्या सेटवर येतात आणि आमचे आभार मानतात. अशा आगळ्या वेगळ्या संकल्पनेवर आम्ही मालिका बनवली आहे याचे ते आवर्जून कौतुक करतात. अभिनव शुक्लासोबत तू अनेक वर्षांपासून नात्यात आहेस, तुम्ही लग्न करण्याचे कधी ठरवले आहे?वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य यांच्यात ताळमेळ राखणे गरजेचे असते असे मी मानते. त्यामुळे मी नेहमीच चित्रीकरणातून वेळ काढून माझ्या कुटुंबीयांसोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवते. सध्या तरी मी माझ्या अभिनय कारकिर्दीवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आयुष्यात सेटल व्हायचा अजून तरी माझा विचार नाहीये.