बॉलिवूडमध्ये कलाकार हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली मतं बिनधास्तपणं मांडतात. यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे स्वरा भास्कर. उत्तम अभिनयासह स्पष्टवक्तेपणामुळे स्वरा कायम चर्चेत येत असते. स्वरा कलाविश्वासह सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. पोस्टद्वारे सामाजिक विषयांवर किंवा कलाक्षेत्रात घडणाऱ्या अनेक विषयांवर परखडपणे आपलं मत मांडत असते. यावेळीही तिने अशीच एक पोस्ट शेअर केली असून ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
इस्त्राइल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेले युद्धावर स्वराने पोस्ट केली आहे. इस्राइलवर टीका करत स्वराने पॅलेस्टाईनचे समर्थन केलं. स्वराने लिहलं की, 'जेव्हा इस्रायलने पॅलेस्टाईनवर हल्ला केले, पॅलेस्टिनी लोकांची घरे उद्ध्वस्त केली, त्यांना जबरदस्तीने हिसकावून लावलं. पॅलेस्टाईनमधील मुले आणि किशोरवयीन मुलींनाही त्यांनी सोडलं नाही. जवळपास 10 वर्षे सतत गाझावर हल्ले आणि बॉम्बस्फोट झाले. तेव्हा जर तुम्हाला धक्का बसला नसेल तर मग आता इस्रायलवरील हल्ल्याबद्दल शोक व्यक्त करणारी लोक मला थोडी ढोंगी वाटतात'.
इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेले युद्ध आणखी बिकट होत चालले आहे. शनिवारपासून दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे. आत्तापर्यंत इस्रायलमध्ये किमान 600 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 1 हजार 590 लोक जखमी झाले आहेत. या युद्धावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. काही लोक इस्त्रायलचा तर काही जण पॅलेस्टाईचे समर्थन करत आहेत.