काही सुनियोजित गोष्टी नियतीच्या गर्भातच जन्माला येतात. त्या गोष्टी तश्या घडव्यात म्हणून विश्व त्याप्रकारे कार्यरत होत जातं, योग्य व्यक्तींची निवड होत जाते आणि त्याचा परिपाक म्हणून एक कलाकृती बाहेर पडते. ‘सचिन बामगुडे’ नावाच्या व्यक्तीने त्यांच्या आयुष्यात जीवनाचे सर्व वाईट चांगले स्तर, अस्तर अनुभवले, व्यावसायिक, कलाकार, खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा ऐकायला मिळतात पण ‘रिलेट’ करू शकू आणि सर्वसामान्य लोकांना ‘अॅक्सेसिबल’ असतील असे कमीच असतात. मात्र यांत सचिन बामगुडे हे एक अपवाद ठरतात. सचिन बामगुडे या अजब वल्लीने आयुष्याच्या साऱ्या रंगछटा अनुभवल्या, तीव्रता भोगली. भटारखान्यात भांडी घासणारा, स्वारगेट बसस्थानकावरील शौचालयात अंघोळ उरकणारा मुलगा, मिळेल ते काम करत शिक्षण सुरू ठेवलेला विद्यार्थी आज कोटींमध्ये उलाढाल करणाऱ्या आणि भारतातील एक क्रमांकाची कर्ज प्रदाता एसपी एंटरप्राइज कंपनीचा मालक आहे. आयुष्याचे सर्व बाउन्सर्स खेळून आता फ्रंट फूटवर संकटांना सीमापार टोलवून लावत जीवनाचा आस्वाद घेत खेळतोय.
कारण जीवनावर असलेलं निस्सीम प्रेम. आयुष्यावरील प्रेम हे कलेशिवाय शक्य नसतं. कलेची जाण, कलेवरील प्रेम हे आयुष्याला उच्च स्तरावर घेऊन जातं. पण कला ही राजाश्रयी असते. ती आश्रयाने वाढते, जास्तीतजास्त योग्यप्रकारे समोर येते. सिनेमा असो वा इतर कोणतीही सांघिक कलाकृती, ती जन्मास यावी, रसिकांपर्यंत पोहचावी यांसाठी आर्थिक पाठबळ हे अवश्यंभावी असतं. आर्थिक पाठबळाशिवाय सर्व कलाकृती पंगू ठरतात.
सचिन बामगुडे यांनी अत्यंत कष्टाचे दिवस जगतानादेखील त्यांनी त्यांची कलेची जाण, कलेवरील प्रेम जपलं. चित्रपट हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. त्यांनी ठरवलं की चित्रपट निर्मिती करावी. दुसरीकडे नियती आपले फांशे टाकत होती. मनोज सावंत या कसलेल्या दिग्दर्शकाकडे एक कथा तयार होत होती आणि त्यांना ती कथा चित्रपटरूपात प्रत्यक्षात आणायची होती. नियतीने मनोज सावंत आणि सचिन बामगुडे यांची गाठ घालून दिली. मनोज सावंत यांनी सचिन बामगुडे यांना कथा ऐकवली, त्यांना कथा खूप आवडली, सचिन यांनी त्यावर सिनेमा निर्मिती करायचं ठरवलं. त्यावर चित्रपट तयार झाला “लव यु जिंदगी”. सचिन बामगुडे हे चित्रपटसृष्टीतील प्रत्यक्ष कार्यपद्धतीपासून अनभिज्ञ असूनही ते जोमाने चित्रपट निर्मितीत उतरले आहेत. चित्रपट निर्मिती प्रक्रियेत अपेक्षित, अनपेक्षित अडचणींवर मात करताना स्वकष्टाने मिळवलेल्या पैश्यातुन त्यांनी हार न मानता चित्रपट निर्मिती केली शिवाय तेच चित्रपट प्रदर्शितदेखील करताहेत. आता एसपी प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी निर्मित सिनेमा महाराष्ट्रभर ११ जानेवारीला प्रदर्शित होतोय. मराठी चित्रपटसृष्टीला सचिन बामगुडे सारख्या प्रामाणिक, कलेची जाण, कलेवर प्रेम आणि कलेला राजाश्रय देणाऱ्या निर्मात्याची गरज आहे.