Join us

'त्या मुलीसाठी आमचा नकार होता पण...'; अक्षयामुळे ठरलं चाहत्याचं लग्न

By शर्वरी जोशी | Updated: July 30, 2023 18:04 IST

Akshaya naik: अक्षयाच्या एका चाहतीने तिच्या होणाऱ्या सुनेसाठी नकार दिला होता. मात्र..

'सुंदरा मनामध्ये भरली' या गाजलेल्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक. या मालिकेत लतिका ही भूमिका साकारुन अक्षयाने तुफान लोकप्रियता मिळवली. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. अलिकडेच तिने 'लोकमत ऑनलाइन'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिच्यामुळे एका चाहत्याचं चक्क लग्न ठरलं असं तिने सांगितलं.

"आमच्या सेटवर एक मावशी होत्या आणि त्यांनी मला सांगितलं की तुझ्यामुळे माझ्या मुलाचं लग्न ठरलं. माझ्या मुलाची एक मैत्रीण होती पण आम्हाला ती काही आवडली नव्हती. ती थोडीशी हेल्दी असल्यामुळे आमचा नकार होता. पण, तुमची मालिका पाहिल्यावर आम्हाला असं वाटलं की चला मुलगा म्हणतोय तर, त्या मुलीला भेटून पाहुयात आणि, ती मुलगी खूप चांगली आहे. आता असं झालंय की तिच्यावाचून आमच्या घरात पान सुद्धा हलत नाही'',असं त्या मावशींनी अक्षयाला सांगितलं.

पुढे ती म्हणते, "या मालिकेमुळे अशा खूप साऱ्या लोकांचा इतरांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. आणि, ही खूप चांगली गोष्ट आहे." दरम्यान, अक्षयाने सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेव्यतिरिक्त हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. परंतु, सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. ही मालिका गेल्या ३ वर्षांपासून यशस्वीरित्या वाटचाल करत आहे. 

टॅग्स :अक्षया नाईकसेलिब्रिटीटेलिव्हिजन