'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (maharashtrachi hasyajatra) या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे नम्रता आवटे-संभेराव (namrata sambherao). कधी लॉली, कधी अवली तर कधी आणखी काही होऊन तिने प्रेक्षकांचं निळख मनोरंजन केलं. त्यामुळे सोशल मीडियावर आज तिचा मोठा चाहतावर्ग पाहायला मिळतो. प्रेक्षकांना हसवणाऱ्या नम्रताने खऱ्या आयुष्यात बराच संघर्ष केला आहे. काही वेळा तिला दु:खाचाही सामना करावा लागला. याविषयी तिने मित्र म्हणे या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला.नम्रताने दिलेल्या मुलाखतीमध्ये पहिल्यांदाच तिच्या प्रेग्नंसीविषयी भाष्य केलं. लग्नानंतर जवळपास ६ वर्ष ती बाळासाठी प्रयत्न करत होती. मात्र, तिच्या पदरात अपयश येत होतं. परंतु, आयुष्यात असा एक काळ आला जिथे तिला मातृत्वाची चाहुल लागली. मात्र, त्याच काळात ती हास्यजत्रेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होती. या काळात तिची काय अवस्था झाली होती. तिने कशाप्रकारे डिप्रेशनचा सामना केला हे तिने या मुलाखतीमध्ये सांगितलं.'तुझ्या आयुष्यात कधी डिप्रेशनचा काळ आलाय का?' असा प्रश्न नम्रताला विचारण्यात आला होता. त्याचं उत्तर देताना तिने तिच्या प्रेग्नंसीविषयी भाष्य केलं."हो असा काळ आलाय. त्यावेळी मी खूप रडले होते. महाराष्ट्राची हास्यजत्रा ५ वर्षापूर्वी सुरु झाली. आणि, दुसऱ्या एपिसोडला कळलं की मी प्रेग्नंट आहे. मग मी सरांनाकडे गेले, त्यावेळी दुसरंच शेड्युल होतं. त्यात पण मी कॅप्टनमध्ये होते. मी, प्रसाद खांडेकर,समीर दादा सगळेच. मी सरांकडे गेले आणि म्हटलं, सर एक गुडन्यूज आहे. मी प्रेग्नंट आहे. त्यावेळी त्यांना कळेच ना की कसं रिअॅक्ट व्हावं कारण त्यांच्यातला निर्माता जागा झाला, एक गुरु पण जागे झाले. त्यांना थोडं टेन्शन आलं की नमा प्रेग्नंट आहे म्हणजे आता यापुढे ती हास्यजत्रेत नसणार आहे", असं नम्रता म्हणाली.
पुढे ती म्हणते, "सरांची ती अॅक्शन पाहून मला छानही वाटलं होतं. पण, त्यावेळी मला सरांनी, समीर दादा, प्रसाद, गोस्वामी सर, हास्यजत्रेची टीम सगळ्यांनी खूप सपोर्ट केला. मला त्यावेळी कळेच ना कारण, मी सहा वर्षांनी प्रेग्नंट झाले होते. आम्ही खूप प्रयत्न करत होतो. आणि, ते होत नव्हतं. पण, फायनली मी आई होणार होते. त्यामुळे तो वेगळा आनंद होता. मग सरांशी चर्चा करुन मला जेवढं, जसं जमेल तसं काम करेन सांगितलं. आणि मी ७ महिन्यांपर्यंत काम केलं."दरम्यान, बाळाच्या जन्मानंतर ६ महिन्यांनी नम्रता हास्यजत्रेच्या सेटवर पुन्हा परतली त्यावेळी काम करताना तिला बरंच डिप्रेशन आलं होतं. वाढलेलं वजन, चेहऱ्यावरील सूज यामुळे तिचा कॉन्फिडन्स गेला होता. त्यामुळे तिला डिप्रेशन आलं होतं असं तिने सांगितलं.