Join us

हटके विषय सिनेमात मांडले तरच प्रेक्षक पुन्हा थिएटरकडे वळतील - आयुष्यमान खुराणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 3:42 PM

जगभरात उपलब्ध झालेल्या सर्वोत्तम कंटेंटचा अनुभव यापूर्वीच प्रेक्षकांनी घेतला आहे. आता थिएटरकडे पुन्हा परतताना हा विचार ते नक्कीच करतील.

बॉलिवूड स्टार आयुषमान खुरानाने अनुभव सिन्हाच्या आर्टिकल 15 मध्ये आपल्या अदाकारीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या चित्रपटाच्या दुसऱ्या वर्षगाठीनिमित्त आयुषमानला वाटते की, महासाथीनंतर दमदार कथानकच प्रेक्षकांना पुन्हा थिएटरपर्यंत खेचून आणेल.आयुषमानने सलग आठ हिट सिनेमे दिले, हे आठ सिनेमे भारतात कंटेंट सिनेमाचा चेहरा ठरले. आयुषमान सांगतो, “आर्टिकल 15 हा सिनेमा माझ्या सिने-कारकिर्दीतील अतिशय विशेष कलाकृती होती. माझ्या करियरमधील सर्वात समृद्ध कथानक असलेला सिनेमा अनुभव सिन्हा यांनी मला दिला. त्याविषयी त्यांचे जितके आभार मानावे, तितके कमीच आहेत. या सिनेमाचा विषय डोळ्यांत अंजन घालणारा होता. एखाद्या गोष्टीकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची संधी मला या सिनेमाने दिली. आपल्याला आर्टिकल 15 सारख्या सिनेमांची आवश्यकता आहे. या सिनेमाचे कथानक अगदी सशक्त होते. अशाप्रकारचे सिनेमे लोकांना पुन्हा थिएटरकडे खेचून आणतील.” 

तो पुढे सांगतो की, “आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण व्हावे लागेल. प्रेक्षक वर्ग ताज्या कथानकाची मजा घेतात. अशी कथानके लोकांना गुंगवून ठेवतात आणि त्यांची चर्चा होते. कोरोनामुळे पूर्वीपेक्षा अधिक सजग झालो आहोत. जे काही हटके दिसले केवळ त्यातच लोकांना आपला वेळ आणि ऊर्जा खर्ची करणे पसंत असते. त्यांना मौल्यवान कम्युनिटी एक्सपिरिअन्स घ्यायचा असतो.

 निराळ्या विषयांवर आधारीत सिनेमांवर या तरुण अभिनेत्याचा विश्वास आहे. अशा कथानकांच्या जोरावर भारतात पुन्हा एकदा थिएट्रीकल बिझनेस सुरू होईल. तो सांगतो, “सिनेमा त्यांना हा पर्याय देऊ करतो. मात्र यापूर्वी कधीही न पाहिलेल्या सिनेमाची निर्मिती आपल्याला करावी लागेल. नवीन कल्पनांचा आविष्कार करणाऱ्या सिनेमांनी मनोरंजन करावे असे प्रेक्षकांना वाटते. सिनेमाची लांबी महत्त्वाची नसून संपूर्ण नव्या दुनियेकरिता कंटेंट महत्त्वाचा ठरतो.”

आयुषमान पुढे म्हणतो की, “जगभरात उपलब्ध झालेल्या सर्वोत्तम कंटेंटचा अनुभव यापूर्वीच प्रेक्षकांनी घेतला आहे. आता थिएटरकडे पुन्हा परतताना हा विचार ते नक्कीच करतील. त्यामुळे कंटेंट महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना तसा पुरवठा करण्याकडे लक्ष केंद्रित करू. जेणेकरून आपण पुन्हा एकदा उद्योग आणि प्रदर्शन क्षेत्राला चालना देण्यात यशस्वी होऊ.”अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘चंदिगड करे आशिकी’, अनुभव सिन्हाचे दिग्दर्शन लाभलेला ‘अनेक’ आणि अनुभूती कश्यप दिग्दर्शित ‘डॉक्टर जी’ या टॉप सिनेमांतून लवकरच आयुषमान प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे.

टॅग्स :आयुषमान खुराणामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस