मागील अनेक दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात जी उलथापालथ झाली, त्याच्याशी मिळते जुळते संदर्भ असलेली ‘मी पुन्हा येईन’ (Mi Punha Yein) ही वेबसीरिज सध्या चांगलीच गाजते आहे. प्लॅनेट मराठीवरच्या या सीरिजने सगळ्यांना वेड लावले आहे. या वेब सीरिजचे शेवटचे दोन एपिसोड उद्या शुक्रवारी १२ ऑगस्टला रिलीज होत आहेत. या सीरिजमध्ये भारत गणेशपुरे(Bharat Ganeshpure)ने सम्राट वाकडेची भूमिका साकारली आहे. दरम्यान आता त्याचा सोशल मीडियावरील एक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे.
भारत गणेशपुरेचा नुकताच सोशल मीडियावरील एक व्हिडीओ समोर आला आहे. यात त्याला काही प्रश्न विचारण्यात आले आहेत, ज्याची उत्तरे देताना तो दिसतो आहे. त्याचा मी पुन्हा येईनमधील आवडता डायलॉग कोणता, असे विचारल्यावर तो म्हणाला की, कार्यकर्ता हा चमच्यासारखा असतो...चमच्याचं काम फक्त वाटीतून गुलाबजामून काढून माणसापर्यंत पोहचवण्याचे असते. त्या चमच्याला काहीच भेटत नाही. म्हणून म्हणतो कार्यकर्ता वाचेल की नेता वाचेल हे तुमचं तुम्ही ठरवा. या सीरिजमधील आवडते पात्र कोणते, असे विचारल्यावर त्याने सांगितले की, वाकड्याचं जे मी करतो आहे.
अरविंद जगताप लेखक की दिग्दर्शक, असे विचारल्यावर भारत गणेशपुरे म्हणाला की, दिग्दर्शक म्हणून काम करतो असे वाटत नाही. फार सुंदर दिग्दर्शन केले आहे. त्याच्यामुळे आता लेखकापेक्षा दिग्दर्शक म्हणून तो वरचढ झालेला आहे. सामना आणि वझीर हे त्याचे आवडते राजकीय चित्रपट आहेत.