Join us

Aarya 3 Trailer : "बच्चों के हिफाजत के लिए माँ को राक्षस बनना पडता है..", 'आर्या ३'चा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 2:03 PM

Sushmita Sen's Aarya 3 : 'आर्या ३'च्या ट्रेलरमध्ये सुष्मिता सेनचा दमदार अंदाज पाहायला मिळतो आहे.

अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) 'आर्या ३' (Aarya 3) या वेब सीरिजमधून पुन्हा एकदा दमदार कमबॅक करत आहे. या मालिकेच्या पहिल्या दोन सीझनमध्ये सुष्मिता सेनने आर्याच्या भूमिकेत जे काही केले, ते तिने आपल्या कुटुंबासाठी केले. आता या सीझनमध्ये ती जे काही करेल ते ती स्वतःसाठी करेल म्हणजेच ती डॉन म्हणून राज्य करेल. गुरुवारी मुंबईत 'आर्या ३'च्या ट्रेलर लॉन्चवेळी सुष्मिता सेन म्हणाली की, यावेळी सर्व काही तीन वेळा पाहायला मिळेल.

ट्रेलरमध्ये आर्या आणि तिची मुले पाहायला मिळत आहे. यावेळी ड्रग्स माफिया बनलेली आर्या आपला ड्रग्जचा धंदा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. केवळ देशातीलच नाही तर परदेशी लोकही तिच्या मागे लागले आहेत. प्रत्येकाला सिंहिणीला पकडून तिला मारायचे आहे, पण आर्या हा पराभव स्वीकारणार नाही. पती गमावल्यानंतर तिची तीन मुलं आर्यासाठी सर्वात महत्त्वाची आहेत. व्यवसाय वाढवण्यासोबतच ती मुलांचे संगोपनही करत आहे. याचा अर्थ असा की तिचे शत्रू तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मुलांचा वापर करतील. अशा परिस्थितीत आर्याला आपल्या मुलांना वाईटापासून वाचवण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी अनेक अवघड वाटेवरून जावे लागेल. अनेकांना मरावे लागेल आणि तिलाही गोळ्या झेलाव्या लागतील. 'आर्या ३' च्या ट्रेलरमध्ये पुन्हा एकदा सुष्मिताचा दमदार अंदाज पाहायला मिळत आहे.

ट्रेलर लॉन्च दरम्यान, सुष्मिता सेनने ट्रेलरमधील  ''बच्चों के हिफाजत के लिए माँ को राक्षस बनना पडता है..'' असा संवाद बोलून खूप टाळ्या मिळवल्या. आठ वर्षांच्या दीर्घ विश्रांतीनंतर, सुष्मिता सेन २०२२ साली 'आर्या या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये परतली. सुष्मिता सेन म्हणते, 'आठ वर्षांनी जेव्हा मी परतले तेव्हा मी स्वत:ला नवोदित समजत होते. आणि, एक नवोदित अभिनेत्री म्हणून अनेक पात्रं साकारायची आहेत, रोमँटिक पात्रं साकारायची आहेत, मला सर्वात धोकादायक खलनायकाची भूमिका करायची आहे.  

यादरम्यान  ''बच्चों के हिफाजत के लिए माँ को राक्षस बनना पडता है..'' या संवादावर सुष्मिता सेन म्हणते, 'कोणतीही आई आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. 'आर्या'च्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझनमधली माझी व्यक्तिरेखा पाहून लोक म्हणायचे की, जर ती इतकं करते तर ती डॉन का होत नाही? आता या सीझनमध्ये प्रेक्षकांना मी डॉनच्या भूमिकेत पाहायला मिळेल.

टॅग्स :सुश्मिता सेन