Heeramandi : संजय लीला भन्साळी यांची बहुप्रतिक्षित 'हीरामंडी: द डायमंड बाजार' ही वेबसीरीज लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, या वेबसीरीजबद्दल अभिनेता ताहा शाहने एक भाष्य केलं आहे.
हीरामंडीमध्ये ताहा शाह बदुसाने देखील काम केलं आहे. या वेबसीरीजमध्ये अभिनेत्याला काम करण्याची संधी कशी मिळाली यासंदर्भात त्याने केलेलं वक्तव्य चर्चेचा मुद्दा बनलं आहे. या सीरीजकरिता सिलेक्शन होण्यासाठी त्याने जवळपास १५ महिने ऑडिशन्स दिल्या, असं त्याने सांगितलं. ताहा शाहने यामध्ये नवाब ताजदार बलूच नावाचं पात्र साकारलं आहे.
आपल्या ऑडिशन प्रवासाविषयी सांगताना अभिनेता म्हणतो, ''उत्तम कलाकारांसोबत काम करण्याचं स्वप्न पाहिलं, संजय लीला भंसाळींच नाव त्या यादीत अव्वल स्थानावर होतं. फक्त आणि फक्त त्यांच्यासोबत काम करता यावं यासाठी मी १५ महिने ऑडिशन्स दिले आणि त्याचं फळ मला मिळालं. पण या वेबसीरीजमध्ये मला केवळ ३ दिवसांचा रोल मिळाला. परंतु मला भन्साळींसोबत काम करून त्यांच मोलाचं असं मार्गदर्शन मिळालं.''
''मला मााहित नव्हतं ही फक्त सुरूवात आहे. स्क्रीन टेस्ट झाल्यानंतर भन्साळींनी मला बोलवलं आणि ताजदार हे पात्र साकारण्याची ऑफर दिली. तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे''. असं अभिनेत्याने म्हटलं.
पाकिस्तानातील वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी ही सीरीज आहे. शिवाय यामध्ये देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील संघर्ष देखील दाखवण्यात आला आहे. हीरामंडीमध्ये सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, आदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, अध्यायन सुमन, शेखर सुमन, फरदीन खान, संजीदा शेख आणि ताहा शाह बदुशा अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. येत्या १ मे रोजी ही सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.