अनेकदा अभिनेत्रींना कास्टिंग काऊच अथवा फसवणुकीच्या प्रकारांना सामोरं जावं लागतं. विशेषतः करिअरच्या सुरुवातीला कलाकार अशा फसवणूक करणाऱ्या प्रकारांना बळी पडतात. अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने 'लोकमत फिल्मी'शी बोलताना तिला आलेला असा अनुभव शेअर केलाय. याशिवाय कलाकारांनी 'नाही' म्हणण्यावर आणि एखाद्या गोष्टीवर कसं ठाम राहायला हवं, याचाही अनुभव तिने सांगितलाय.
ज्ञानदाला आलेला कास्टिंग काऊचचा अनुभव
ज्ञानदा अनुभव शेअर करताना म्हणाली की, "मला असा अनुभव कधी आला नाही. हा पण एकदा मला साऊथ तेलुगु फिल्म्ससाठी फोन आला होता. तुला compromise करावं लागेल अशी त्या व्यक्तीची फोनवर भाषा होती. त्यानंतर मी त्या माणसाला जास्त एन्टरटेन केलं नाही. काही गोष्टी आपणही ठरवणं चांगलं असतं. आपण ठामपणे आपला मुद्दा समोरच्या व्यक्तीला सांगणं ही मोठी गोष्ट आहे. काही गोष्टींना नाही म्हणणं गरजेचं असतं."
कलाकाराची जेव्हा सुरुवात असते तेव्हा...: ज्ञानदा
ज्ञानदा पुढे म्हणाली, "आपणच वेळीच त्या गोष्टींना आळा घातला तर असं घडणार नाही. माझ्या प्रेक्षकांचं खूप प्रेम आहे माझ्यावर. मराठी प्रेक्षकांसारखा ऑडियन्स कुठे सापडणार नाही. मला इथे एवढं प्रेम मिळत असेल तर दुसरीकडे जाऊन मला अशा फालतू गोष्टी करायची गरज नाही. जेव्हा कलाकाराची सुरुवात असते तेव्हा त्याला अशा गोष्टी जास्त फेस कराव्या असतात. अशा गोष्टी मराठीत घडत नाही. जेव्हा मला तो फोन आला होता तेव्हा मी त्याला चार खडे बोल सुनावले आणि नंबर ब्लॉक करून टाकला."
ज्ञानदाची भूमिका असलेली 'कमांडर करण सक्सेना' ही वेबसीरिज हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालीय. या वेबसीरिजमध्ये ज्ञानदाने एका कोळी मुलीची भूमिका साकारलीय. ज्ञानदासोबत या वेबसीरिजमध्ये मराठमोळी अभिनेत्री हृता दुर्गुळे झळकत आहे. याशिवाय अभिनेता गुरमीत चौधरी सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत पाहायला मिळतोय. ज्ञानदाची ही पहिली हिंदी वेबसीरिज आहे. (शब्दांकन: देवेंद्र जाधव)