'शोले', 'दिवार', 'जंजीर' हे सिनेमे आठवले की आपसूक आपल्या ओठांवर सलीम-जावेद जोडीचं नाव येतं. सलीम-जावेद जोडीने मनोरंजन विश्वाला अनेक सिनेमे दिले. अशी पहिली लेखक जोडी होती ज्यांचा बॉलिवूडमध्ये बोलबाला होता. आजही सलीम-जावेद यांनी लिहिलेले सिनेमे प्रेक्षकांच्या आवडीचे आहेत. बॉलिवूडमध्ये इतकी वर्ष अधिराज्य गाजवलेली ही जोडी लोकप्रिय कशी झाली? पुढे हे दोघे वेगळे का झाले? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या वेबसीरिजमधून बघायला मिळणार आहेत.
'अँग्री यंग मॅन' वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज
'अँग्री यंग मॅन' वेबसीरिजचा ट्रेलर आज रिलीज झालाय. तीन भागांमध्ये ही वेबसीरिज बघायला मिळणार आहे. सलीम-जावेद या जोडीचं आयुष्य आणि त्यांची कारकीर्द यावर ही वेबसीरिज आधारीत आहे. १९७० च्या काळात 'अँग्री यंग मॅन' अभिनेत्याला घेऊन सलीम-जावेद यांनी लिहिलेल्या सिनेमांनी बॉलिवूडचा चेहरामोहरा बदलून टाकला. नेहमीच्या रोमँटिक सिनेमांपेक्षा वेगळे सिनेमे सलीम-जावेद या जोडीने सर्वांसमोर आणले. सलीम-जावेदने रोमँटिक सिनेमांपेक्षा एक्शन-ड्रामा सिनेमांवर जास्त भर टाकून हे सिनेमे लोकांसमोर आणले.
कधी रिलीज होणार 'अँग्री यंग मॅन' ही वेबसीरिज
प्राईम व्हिडीओवर 'अँग्री यंग मॅन' ही वेबसीरिज २० ऑगस्टला प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. या वेबसीरिजमध्ये सलीम-जावेद यांची मुलाखत आहेच. शिवाय अमिताभ बच्चन, जया बच्चन, हेमा मालिनी, हेलेन, सलमान खान, ऋतिक रोशन, आमिर खान, फरहान अख्तर आणि करीना कपूर खान अशा कलाकारांच्या प्रतिक्रिया सुद्धा पाहायला मिळणार आहेत. एक काळ गाजवलेल्या लेखक जोडगोळीला या वेबसीरिजच्या माध्यमातून अनोखा सन्मान मिळणार आहे.