रविवारी भोपाळमध्ये बजरंग दलाच्या (Bajrang Dal )शेकडो कार्यकर्त्यांनी दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या ‘आश्रम 3’ ( Ashram 3) या वेबसीरिजच्या सेटवर जोरदार राडा घातला. यादरम्यान प्रकाश झा (Prakash Jha) यांच्या चेह-यावर शाई फेकत या कार्यकर्त्यांनी सेटवरच्या साहित्याची तोडफोड केली. इतकंच नाही सेटवरच्या काही क्रू सदस्यांचा पाठलाग करून त्यापैकी एक-दोघांना पकडून त्यांना मारहाण करत व्हॅनिटी व्हॅनसह 5 वाहनांची तोडफोड केली. या हल्ल्यात 4 ते 5 कर्मचारी जखमी झाले. काही पत्रकारांनाही मारहाण करण्यात आल्याचं कळतंय. (Bajrang Dal Attacks)दरम्यान या संपूर्ण प्रकरणात प्रकाश झा यांनी पोलिसात तक्रार करण्यास नकार दिला आहे.
भोपाळच्या जुन्या तुरुंगात (अरेरा हिल्स) आश्रम 3 या वेबसीरिजचं शूटींग सुरू होतं. शूटिंग चालू असताना रविवारी संध्याकाळी बजरंग दलाच्या सुमारे अडीचशे सदस्यांनी सेटवर हल्लाबोल केला. प्रकाश झा मुर्दाबाद, बॉबी देओल (Bobby Deol) मुर्दाबाद अशा घोषणा देत हे कार्यकर्ते सेटवर आले आणि यांनी प्रकाश झा यांना बाहेर बोलवलं. यादरम्यान संतप्त कार्यकर्त्यांची झा यांच्याशी बाचाबाची झाली. यानंतर आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी व्हॅनिटी व्हॅन, कार, ट्रकमध्ये ठेवलेले सामान, आवारात उभ्या असलेल्या मशिनरींची तोडफोड सुरू केली. सेटवरच्या कर्मचा-यांनी विरोध केल्यावर त्यांना मारहाण करण्यात आली.
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश झा यांच्यावर आश्रम वेब सीरिजद्वारे हिंदू धर्माची बदनामी केल्याचा आरोप केला. वेबसीरिजचं नाव बदला अन्यथा शूटींग होऊ देणार नाही, असा इशाराही या कार्यकर्त्यांनी दिला. बजरंग दलाचे प्रांतीय निमंत्रक सुशील यावेळी म्हणाले की, ‘प्रकाश झा यांनी आश्रम, आश्रम 2 बनवली. आता आश्रम 3 चे शूटींग सुरू आहे. आश्रमात एक गुरू महिलांचं लैंगिक शोषण करतोय, असं त्यांनी दाखवलं आहे. चर्च किंवा मदरश्यांमध्ये असं दाखवण्याची त्यांची हिंमत आहे का? ते स्वत:ला काय समजतात? आम्ही बॉबी देओलला शोधतोय. त्याला त्याचा भाऊ सनी देओलकडून काही शिकायला हवं. त्यांनी वेबसीरिजचं नाव बदलावं अन्यथा आम्ही भोपाळमध्ये शूटींग होऊ देणार नाही. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी नाव बदलण्याचं आश्वासन दिलं आहे. नाव बदललं नाही तर शूटिंगला परवानगी दिली जाणार नाही. इतकंच नाही तर ही वेबसीरिज प्रदर्शितही होऊ देणार नाही.’