Join us

'मानवत मर्डर्स'मध्‍ये आशुतोष गोवारीकर दिसणार प्रसिद्ध डिटेक्टिव्‍हच्‍या प्रमुख भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 20:11 IST

Ashutosh Gowarikar : सोनी लिव्‍ह रोमांचक क्राइम थ्रिलर सीरिज ‘मानवत मर्डर्स' घेऊन येत आहे. या सीरिजमध्ये आशुतोष गोवारीकर भारताचे शेरलॉक होम्‍स म्‍हणून ओळखले जाणारे प्रतिष्ठित सीआयडी डिटेक्टिव्‍ह ऑफिसर रमाकांत एस. कुलकर्णी यांची भूमिका साकारणार आहेत.

सोनी लिव्‍ह रोमांचक क्राइम थ्रिलर सीरिज ‘मानवत मर्डर्स' (Manavat Murders) घेऊन येत आहे. ही सीरिज सर्वात धक्कादायक ऐतिहासिक घटनेचा उलगडा करते, जिने ७०च्‍या दशकात देशाला हादरून टाकले. आशिष बेंडे यांचे दिग्‍दर्शन असलेल्‍या या सीरिजमध्‍ये प्रतिष्ठित कलाकारांसह आशुतोष गोवारीकर आहेत, जे या सीरिजमध्‍ये भारताचे शेरलॉक होम्‍स म्‍हणून ओळखले जाणारे प्रतिष्ठित सीआयडी डिटेक्टिव्‍ह ऑफिसर रमाकांत एस. कुलकर्णी यांची भूमिका साकारणार आहेत.

रमाकांत एस. कुलकर्णीची भूमिका साकारण्‍याबात आशुतोष गोवारीकर म्‍हणाले, “आज मुंबई सीआयडीचे पोलिस अधिकारी  रमाकांत एस. कुलकर्णी यांची भूमिका साकारण्‍याची संधी मिळाल्‍याने मी स्‍वत:ला भाग्‍यवान मानतो. त्‍यांनी अनेक केसेस सोडवल्‍या, ज्‍यांचा अन्‍यथा उलगडा झाला नसता. यामध्‍ये कुप्रसिद्ध मानवत मर्डर्सचा देखील समावेश आहे. ते भारताचे शेरलॉक होम्‍स म्‍हणून ओळखले जायचे. त्‍यांचे आत्‍मचरित्र ‘फूटप्रिंट्स ऑन द सँड ऑफ क्राइम'मध्‍ये या हत्‍याकांडामधील संपूर्ण प्रक्रिया, त्‍यांनी बारकाईने घेतलेला शोध, संशयित व्‍यक्‍तींसंदर्भात केलेली हाताळणी, त्‍यांना गुन्‍ह्याची कबूली देण्‍यास भाग पाडलेली स्थिती अशा अद्भुत बाबींची माहिती आहे, तसेच ‘सत्‍यापलीकडे सत्‍याचा शोध' यावरील त्‍यांचा विश्‍वास देखील दिसून येतो.'' 

ते पुढे म्‍हणाले, “या सिरीजचा आणखी एक उत्‍साहवर्धक पैलू म्‍हणजे मी खूप वर्षांनंतर मकरंद अनासपुरेसोबत काम केले आणि माझ्या दोन आवडत्‍या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व सई ताम्‍हणकर यांच्‍यासोबत काम करण्‍याची संधी मिळाली.  त्‍यांच्‍यासोबत काम करणे म्‍हणजे अभिनयाचे नवीन धडे मिळवण्‍यासारखे होते. मला दिग्‍दर्शक आशिष बेंडे यांच्‍यासोबत काम करण्‍याचा देखील आनंद झाला आहे, ज्‍यांना ही कथा, शैली आणि सर्वात महत्त्वाचे म्‍हणजे माझ्या भूमिकेबाबत सखोलपणे माहित होते.''    

टॅग्स :आशुतोष गोवारिकरसई ताम्हणकरसोनाली कुलकर्णीमकरंद अनासपुरे