Join us  

अविनाश नारकर यांची नवी वेब सीरिज, कोकणचं सौंदर्य दाखवणारं ‘गाव कोकण’ गाणं प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 4:55 PM

‘देवाक काळजी २’ या वेब सीरिजमध्ये अविनाश नारकर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर अविनाश नारकर यांच्या या नव्या वेब सीरिजमधील गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

अविनाश नारकर हे मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आहेत. त्यांनी त्यांच्या अभिनयाने एक काळ गाजवला. आता वेब सीरिजमधून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ‘देवाक काळजी २’ या वेब सीरिजमध्ये अविनाश नारकर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर अविनाश नारकर यांच्या या नव्या वेब सीरिजमधील गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. 

अभिनेता समीर खांडेकर दिग्दर्शित ‘देवाक काळजी १’ या वेबसिरीजला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवाचं औचित्य साधत ‘देवाक काळजी २’ ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजमधील ‘गाव कोकण’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यात अविनाश नारकर, केतकी पालव, पूजा खानोलकर हे कलाकार आहेत. तर राजेश्वरी पवार हिने हे गाणं गायलं आहे. रविराज काळे यांनी या गाण्याचं संगीत केलं असून गीतकार मंदार इंगळे आहेत. अनुश्री फिल्म्सचे निर्माते मयूर तातुसकर आणि आपली सोसल वाहिनी निर्मित ‘देवाक काळजी २’ या वेबसीरीजमधील ‘गाव कोकण’ हे गाणं अनुश्री फिल्म्सवर प्रदर्शित झालं आहे. 

या गाण्याविषयी दिग्दर्शक -अभिनेता समीर खांडेकर सांगतात, “अनुश्री फिल्म्स आणि 'आपली सोसल वाहिनी' विषयी सांगायचं झालं, तर या दोन्ही प्रोडक्शन हाऊसने एकत्र येऊन खूपच दर्जेदार कामगिरी केली आहे. मी या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे. आमचा उद्देश स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांची कला प्रेक्षकांसमोर आणणं आहे.”

निर्माते मयूर तातुसकर या गाण्याच्या चित्रीकरणाविषयी सांगतात, “'गाव कोकण' या गाण्याचं चित्रीकरण अत्यंत खास आणि अविस्मरणीय होतं. कोकणाचं नैसर्गिक सौंदर्य आणि तिथलं लोकजीवनाचं जिवंत चित्रण करण्यासाठी आम्ही विशेष मेहनत घेतली. चित्रीकरणासाठी नैसर्गिक आणि सुंदर ठिकाणं निवडली होती. ज्यामुळे कोकणाचं अप्रतिम सौंदर्य गाण्यात सजीव झालं. आपली सोसल वाहिनीच्या ‘देवाक काळजी सीझन १’ या सिरीजला मिळालेल्या प्रेरणेतून आम्ही सीझन २ मध्ये सहभागी झालो. स्थानिक लोकांनी या कलाकृतीत खूप सहकार्य केलं, ज्यांचे मनःपूर्वक आभार मानावेसे वाटतात. त्यांच्यामुळे या गाण्यातील प्रत्येक दृश्य अधिक प्रभावीपणे चित्रित करता आलं.”

टॅग्स :अविनाश नारकरमराठी अभिनेतासेलिब्रिटी