बॉलिवूडच्या ७०च्या दशकातील नाटयमय प्रेमकथा 'रंजिश ही सही', येणार या दिवशी भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 09:23 PM2022-01-05T21:23:42+5:302022-01-05T21:24:06+5:30
'रंजिश ही सही' (Ranjish Hi Sahi) ही वेबसीरिज १३ जानेवारीला भेटीला येणार आहे.
काही वर्षांच्या आठवणी आपल्या स्मरणात कायमस्वरूपी राहतात आणि बॉलिवुडच्या ७०च्या सुवर्ण दशकामध्ये स्थित नाट्यमय प्रेमकथा 'रंजिश ही सही' (Ranjish Hi Sahi) सुरूवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवेल. मुकेश भट व जिओ स्टुडिओज निर्मित या वेब सिरीजमध्ये ताहिर राज भासिन (Tahir Raj Bhasin), अमला पॉल (Amla Paul) व अमृता पुरी (Amruta Puri) प्रमुख भूमिकेत आहेत. 'रंजिश ही सही' वूट सिलेक्टवर १३ जानेवारीपासून पाहायला मिळणार आहे.
महेश भट यांची निर्मिती, पुष्पदीप भारद्वाज यांचे लेखन व दिग्दर्शन असलेली विशेष एंटरटेन्मेंट प्रॉडक्शनची ही सिरीज नवोदित आवारा चित्रपट दिग्दर्शकाच्या अवतीभोवती फिरते. त्याचे एका विलक्षण सुपरस्टारसोबत विवाहबाह्य प्रेमप्रकरण जुळते, ज्यामुळे त्याच्या जीवनाला कायमस्वरूपी कलाटणी मिळते. त्याच्या पहिल्या प्रेमिकेसोबतचा विवाह विस्कळीत होतो आणि तो दोन विश्वांमध्ये अडकून जातो. मुख्यत्वे बॉलिवुडचे ७०चे दशक म्हणजेच बेलबॉटम्सच्या सुवर्ण युगामध्ये स्थित आणि उत्तम संगीत असलेल्या या सिरीजचे कथानक शंकर, आमना व अंजू यांच्या जीवनांच्या अवतीभोवती फिरते. कथानक प्रौढ व्यक्तींमधील जटिल मानवी नाते आणि प्रेमाच्या विभिन्न छटांना दाखवते. प्रखर ड्रामा असलेली ही सिरीज प्रलोभन, निषिद्ध प्रेम, उत्कटता, विश्वास, विवाह, निष्ठा, बिनशर्त, स्थिरता, ध्यास आणि अनेक भावनांमधील दुरावा या बाबींना सादर करते.
शंकरमध्ये त्वरित सामावून गेलो...- ताहिर राज भसिन
अभिनेता ताहिर राज भसिन म्हणाला, ''मला या अद्वितीय प्रेमकथेचे कथानक सांगण्यात आले तेव्हा मी विविध छटा असलेली भूमिका शंकरमध्ये त्वरित सामावून गेलो. रोमँटिक ड्रामाच्या आव्हानाने माझे लक्ष वेधून घेतले, जेथे प्रमुख पात्र त्याच्या जीवनामध्ये दोन महिलांच्या प्रेमामध्ये अडकला आहे. शंकर असुरक्षित रोमँटिक व अधिकृत बंडखोर यामधील दुवा स्पष्ट करतो. ही भूमिका साकारणे जटिल भावनात्मक रोलर कोस्टर असण्यासोबत धमाल अनुभव होता.''
आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत- अमला पॉल
अमला पॉल म्हणाली, ''मला ही भूमिका साकारण्यासाठी विशेष एंटरटेन्मेंटकडून कॉल आला तेव्हा माझी प्रतिक्रिया होती, 'वाह! मी ७०च्या दशकातील बॉलिवुड सुपरस्टारसारखी दिसते का?' मला खूपच आनंद झाला आणि हा आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत.''
नवीन दृष्टिकोन मिळाला - अमृता पुरी
अमृता पुरी म्हणाली, ''अंजूचा साधेपणा तिचे सामर्थ्य आहे. भूमिकेमध्ये सामावून जाण्याचा अनुभव माझ्यासाठी शिकण्यासारखा होता. तिचे जीवन आणि ती राहिलेला काळ या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी वेगळ्या आहेत. ती अत्यंत संवेदनक्षम आहे आणि याच कारणामुळे कुटुंबासोबत एकत्र आहे. मी तिचा सहानुभूतीशील स्वभाव आणि क्षमा करण्याची क्षमता पाहून अचंबित झाले. गृहिणी असण्यासोबत कुटुंबाची भावनिक आधारस्तंभ असणे सोपे नाही. यामधून मला नवीन दृष्टिकोन मिळाला.''