Dancing On The Grave Trailer : ओटीटी प्लॅटफॉर्मवर गेल्यावर्षी 'इंडियन प्रीडेटरः डायरी ऑफ अ सीरियल किलर' नावाची एक सीरिज आली होती. इंडिया टुडे ओरिजनल्सअंतर्गत बनवलेली ही सीरिज प्रचंड गाजली होती. आता पुन्हा एकदा इंडिया टुडे ओरिजनल्सची नवी सीरिज येतेय. नाव आहे ‘डान्सिंग ऑन द ग्रेव्ह’. १५ एप्रिलला या सीरिजचं पोस्टर रिलीज झालं होतं आणि आता या सीरिजचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज झाला आहे. चार मुलींची आई असलेल्या राजघराण्यातल्या एका महिलेच्या निर्घृण हत्याकांडावर आधारित ही सीरिज ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. ३१ वर्षांपूर्वी १९९१ मध्ये घडलेलं हे हत्याकांड प्रचंड गाजलं होतं. ९० च्या दशकात म्हैसूर राजघराण्याच्या माजी दिवाणाची नात शकीरा खलीली अचानक गायब झाली होती. १९९२ मध्ये तिची मोठी मुलगी सबाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. माझी आई गेल्या अनेक महिन्यांपासून बेपत्ता आहे, असं तिने तक्रारीत म्हटलं होतं. पोलिसांनी तपास सुरू केला. पण अनेक महिन्यांनंतरही शकीराचा शोध लागेना.
अखेर १९९४ साली शकीराच्याच घरी एक हाडांचा सांगाडा सापडला आणि यानंतर जे काही समोर आलं, ते ऐकून सगळीकडे खळबळ माजली. २८ एप्रिलल १९९१ रोजी शकीराची निर्घृण हत्या झाली होती. पतीनेच तिला जिवंत गाडलं होतं आणि यानंतर तिच्या थडग्यावर नाचून पार्टी केली होती. त्यामुळे या सीरिजचा ‘डान्सिंग ऑन द ग्रेव्ह’ असं नाव देण्यात आलं आहे.
शकीरा खलीली ही म्हैसूर राजघराण्यातील माजी दिवाण यांची नात आणि रिअल इस्टेट डेव्हलपर होती. तिचं पहिलं लग्न अकबर मिर्झा खलिलीशी झालं होतं. शकीरा खलीलीने मुरली मनोहर मिश्रा उर्फ श्रद्धानंद नावाच्या व्यक्तीशी दुसरं लग्न केलं. शकीराच्या मुली या लग्नाच्या विरोधात होत्या. पण शकीरा श्रद्धानंदच्या प्रेमात होती,त्याची नजर मात्र तिच्या संपत्तीवर होती. एक दिवस त्याने संधी साधत शकीराची हत्या करून तिला जिवंत गाडलं. शकीराला दफन केल्यानंतर तो तिच्या कबरीवर नाचायचा आणि पार्टी करायचा. हे सर्व तीन वर्षे सुरू होतं.