Join us  

"कलाकार अटेंशनसाठी भुकेले असतात...", अभिनेता गश्मीर महाजनीने केली पोलखोल, म्हणाला - "तुमच्या घरात, बेडरूममधील..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 10:48 AM

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये गश्मीर महाजनीने कलाकारांची पोलखोल केली. 

अभिनेता गश्मीर महाजनी याने स्वतःला फक्त मराठी इंडस्ड्रीपर्यंत मर्यादित न ठेवता बॉलिवूडमध्ये देखील अनेक प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे.  सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेता म्हणून गश्मीर याला चाहत्यांकडून प्रेम मिळतं. नुकतंच त्याची 'गुनाह' ही क्राइम थ्रिलर सीरिज OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाली आहे. या सीरिजच्या प्रमोशनसाठी तो विविध ठिकाणी मुलाखती देत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये गश्मीर महाजनीने कलाकारांची पोलखोल केली. 

गश्मीर महाजनीने नुकतेच 'द फ्री प्रेस जर्न'ला मुलाखत दिली. यावेळी त्यानं प्रायव्हसीवरुन जे कलाकार राग आवळतात, त्यांच्या ढोंगीपणावर टीका केली. गश्मीर म्हणाला, 'लोकांच्या नजरेत राहणं हे कोणतेही आव्हान नाही. जर तुम्हाला अभिनेता व्हायचं असेल तर तुम्हाला लोकांच्या नजरेत राहावं लागेल. जर तुम्हाला ते आव्हानात्मक वाटत असेल तर मी म्हणेन, तुम्ही अभिनेता बनू नका. लोकांनी तुमच्याजवळ यावं आणि तुमच्यासोबत सेल्फी काढावेत अशी तुमची इच्छा असते आणि मग तुम्ही 'अरे, हे खूप अवघड आहे, माझं आयुष्यात काय सुरू आहे, याकडे लोकांचं लक्ष असतं' असं म्हणत त्याला ग्लॅमराइज करण्याचा प्रयत्न करता. जर तुम्हाला हे नकोय, तर मग अभिनेता का झालात? अभिनेता होण्यापूर्वी तुम्हाला हे माहित होते की असं घडणार आहे आणि तुम्हाला ते हवं होतं.  प्रत्येक अभिनेत्याला हे हवं असतं'.

गश्मीर म्हणाला, 'कलाकार हे अटेंशनचे भुकेले असतात. त्यांना अटेंशन पाहिजे असतं, हे नाकारणारे लोक खोटे आहेत. आता सोशल मीडियावर लोकांनी आपले खोटे चेहरे दाखवायला सुरुवात केली आहे, प्रत्येकजण खोटं बोलतोय. "अरे माझे खासगी आयुष्य' असं ते फक्त बोलतात. पण माझ्यासह प्रत्येक अभिनेत्याला लोकांचं अटेंशन हवं असतं. ज्या दिवशी लोक तुम्हाला पाहणं बंद करतील, तुमच्याकडे लक्ष देणार नाहीत. त्यादिवशी तुम्ही उद्ध्वस्त व्हाल आणि कोणत्याही अभिनेत्याला हे व्हावं असं वाटत नाही'.

गश्मीर पुढे म्हणाला, 'तुमच्याकडे जी अत्यंत खाजगी गोष्ट आहे, ती तुम्ही लोकांना दाखवू नका. तुमच्या घरात काय आहे, तुमच्या बेडरूममध्ये काय आहे, हे सर्व खाजगी आहे. जोपर्यंत तुम्ही ते व्हिडीओ शूट करुन इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये टाकत नाही. तोपर्यंत कोणीही ते पाहू शकणार नाही. तुम्ही स्वतःच ते दाखवता आणि मग म्हणता माझं वैयक्तिक आयुष्य खासगी राहू द्या'. 

गश्मीर सध्या घरापासून दूर रोमानियामध्ये 'खतरों के खिलाडी सीझन 14' साठी शूटिंग करत आहे. गश्मीरला 'खतरों के खिलाडी' मध्ये स्टंट करताना पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. गश्मीरने आतापर्यंत ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘देऊळ बंद’, ‘विशू’, ‘डोंगरी का राजा’ अशा सिनेमांमध्ये काम केलं आहे. शिवाय तो हिंदी मालिकांमध्ये झळकला आहे.  

टॅग्स :गश्मिर महाजनीसेलिब्रिटीमराठी अभिनेताबॉलिवूडसिनेमाखतरों के खिलाडी