दिग्दर्शक हंसल मेहता यांनी Scam या वेबसिरीजच्या मार्फत एक वेगळीच शैली मनोरंजन विश्वात प्रस्थापित केली. आजही Scam 1992 ही वेबसिरीज लोकांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये असेल यात शंका नाही. Scam 1992 मध्ये हर्षद मेहताचा शेअर मार्केट घोटाळा उघडकीस आणल्यानंतर पुढे Scam 2003 मधून हंसल मेहतांनी तेलगीचा स्टॅम्प पेपर घोटाळा वेबसिरीजच्या माध्यमातून दाखवला. आता दिग्दर्शक हंसल मेहतांनी Scam 2010 या नव्या सिरीजची घोषणा केलीय. या सीरिजमधून कोणता घोटाळा पाहायला मिळणार, जाणून घ्या.
Scam 2010 मधून सहारा स्टार सुब्रत रॉय यांची कहाणी समोर येणार आहे. 'डस्ट टू डायमंड' असं थरारक आयुष्य जगणारे सुब्रत रॉय मोठे उद्योगपती झाले. 'सहारा : द अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकावर ही वेबसिरीज आधारीत आहे. सुब्रत रॉय यांच्यावर बनावट गुंतवणूकदारांचा वापर करत रॉय चिट - फंडचा मोठा घोटाळा केल्याचा आरोप होता. अजूनही कोणाचाही दावा नसलेले तब्बल २५ हजार कोटी रुपये सरकारी अधिकाऱ्यांकडे पडून आहेत.
इतका मोठा गफला करणाऱ्या सुब्रत यांना २०१४ मध्ये अटक करण्यात आली. 'सहारा स्टार' अशी ओळख असलेल्या सुब्रत रॉय यांची हीच कहाणी Scam 2010 मधून पाहायला मिळणार आहे. या वेबसिरीजमध्ये सुब्रत रॉय यांची भूमिका कोण साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 'स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी' आणि 'स्कॅम 2003: द तेलगी स्टोरी' नंतर आता 'स्कॅम 2010: द सुब्रत रॉय सागा' बघायला प्रेक्षक उत्सुक आहेत.