Join us  

IC814: पूजा कटारियांना आठवले हायजॅकचे भयावह दिवस, दहशतवाद्याने दिलेली शाल आजही ठेवली जपून

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 5:51 PM

१९९९ च्या कंदहार हायजॅक मधून बचावलेल्या पूजा कटारिया यांनी नुकतीच मुलाखत दिली. सीरिजवरुन होत असलेल्या वादावरही त्यांनी भाष्य केलं.

दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांची IC814 वेबसीरिज नुकतीच रिलीज झाली. रिलीज होताच सीरिज वादात अडकली. यामध्ये दहशतवाद्यांची खरी नावं सोडून भोला आणि शंकर अशी दाखवण्यात आल्याने प्रेक्षक भडकले. सीरिजवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. खऱ्या आयुष्यात या हायजॅकमधून वाचलेल्या प्रवाशांमधील एक असलेल्या पूजा कटारिया (Pooja Kataria) यांनी नुकतीच एएनआयला मुलाखत दिली. त्यांनी हायजॅकच्या त्या ७ दिवसांचा भयावह अनुभव सांगितला. तसंच सीरिजवरुन होत असलेल्या वादावरही भाष्य केलं.

पूजा कटारिया या चंदीगढच्या आहेत. १९९९ मध्ये लग्नानंतर त्या पतीसोबत हनिमूनसाठी नेपाळला गेल्या होत्या. २४ डिसेंबरला काठमांडूवरुन भारतात येणारं IC814 विमान दहशतवाद्यांनी हायजॅक केलं. विमानात पूजा यांच्यासह आणथी २६ नवविवाहित जोडपे होते. हायजॅकर्सने हे विमान अफगाणिस्तानमधील कंदहार येथे नेलं. हा भयावह अनुभव सांगताना पूजा म्हणाल्या, "मी ते दिवस अजूनही विसरलेले नाही. आम्ही १७६ प्रवासी होतो. टेक ऑफ केल्यानंतर अर्ध्या तासातच दहशतवाद्यांनी डोकं खाली करायला सांगितलं आणि प्लेन हायजॅक झाल्याचं सांगितलं. ते ५ हायजॅकर्स होते. आम्ही सगळे पॅनिक झालो होतो. नक्की काय सुरु आहे हेही आम्हाला दुसऱ्या दिवशी कळलं. ८ दिवस विमान नेमकं कुठे नेऊन पोहोचवलं होतं याचीही आम्हाला कल्पना नव्हती. भारतात आल्यानंतर आम्हाला कळलं की आम्ही ८ दिवस कंदहारमध्ये होतो. ८ दिवस काही खायलाही मिळालं नाही. केवळ एक सफरचंद मिळालं तेच खाल्लं."

त्या पुढे म्हणाल्या, "सुरुवातीचे दोन दिवस टेन्शनचे होते. नंतर त्यांच्यातला एक बर्गर नावाचा हायजॅकर थोडा फ्रेंडली होता. लोकांना पॅनिक अॅटॅक येत होते म्हणून तो वातावरण हलकं करण्यासाठी आम्हाला अंताक्षरीही खेळायला लावायचा. डॉक्टर नावाचा हायजॅकर इस्लाम धर्म स्वीकारा म्हणत भाषण द्यायचा."

सीरिजविषयी काय म्हणाल्या पूजा कटारिया?

"सीरिज मनोरंजनासाठी बनवली आहे त्याचदृष्टीने पाहा. का कोण जाणे यावरुन वाद सुरु आहे. भोला, शंकर अशी त्यांची नावं खरंच होती. ते एकमेकांना याच नावाने बोलवायचे. कदाचित ते त्यांची कोड नेम असतील. पण ही नावं होती आम्ही ऐकली आहेत. मी सीरिज पाहिली. सगळं जसं घडलं तसंच दाखवलं आहे. काहीच जास्तीचं नाही. त्यावेळी सरकारचं अपयश होतं हे सगळ्यांनाच मान्य आहे. कमांडो हल्ला करायला हवा होता."

दहशतवाद्याने गिफ्ट केली शाल

पूजा कटारिया म्हणाल्या, "२७ डिसेंबरला माझा वाढदिवस होता. लोकांना पॅनिक अॅटॅक येत होते तेव्हा बर्गर नावाचा हायजॅकर त्यांना शांत करत होता. त्यामुळे मी बर्गरला बोलवून विनंती केली की माझा उद्या वाढदिवस आहे. कृपया आम्हाला घरी जाऊ दे. आम्ही निर्दोष आहोत. यानंतर त्याने त्याची शाल मला दिली आणि म्हणाला, 'हे माझ्याकडून गिफ्ट'. शेवटी त्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सर्वांना सोडून दिलं तेव्हा बर्गर माझ्याकडे आला आणि त्याने शालवर लिहिलं, 'माझी प्रिय बहीण आणि तिचा हँडसम नवरा, बर्गर ३०/१२/१९९९.

IC 814 द कंदहार हायजॅक ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. विजय वर्मा, पत्रलेखा, अरविंद सामी, नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर, दिया मिर्झा यांच्यासह काही कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली आहे. 

टॅग्स :वेबसीरिजदहशतवादीकाठमांडूअफगाणिस्तान