'अथांग' या मराठी वेब सीरिजचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिने राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी मराठी चित्रपट आणि वेब सीरिजमधील प्रयोग, वेबसीरिजवरील सेन्सॉरशिप, त्यांचे मराठीवरचं प्रेम आणि त्यांच्या आवडत्या वेब सीरिजबदद्ल भाष्य केले.
वेबसीरिजबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मी सीरिजवाला माणूस नाही. मी सिनेमावाला माणूस आहे. २ ते ३ तासांत जे काही सांगायचं ते सांगून द्या. पण आतापर्यंत मी २-४ सीरिज पाहिल्या आहेत. ‘अथांग’ सीरिजही पाहणार आहे. मात्र मी अलीकडेच एक वेब सीरिज पाहिली. खरेतर ही वेब सीरिज पुन्हा पाहावी, असे वाटणे खूप मोठी गोष्ट आहे. मी नुकतीच ‘द ऑफर’ नावाची एक वेबसीरिज पाहिली आणि ती मला परत पाहावीशी वाटतंय. ही ९-१० भागांची सीरिज आहे. ही सीरिज वूटवरती आहे. मी गेल्या काही वर्षांमध्ये पाहिलेली ही उत्तम पीरियड सीरिज आहे. त्यामध्ये ज्याप्रकारे त्यांनी पीरियड मेंटेन केला, ते विलक्षण आहे. पण त्यासाठी त्यांच्याजवळ जी साधने आहेत, ती आपल्याकडे नाहीत.
ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सेन्सॉरशीपबद्दल आपलं मत व्यक्त करताना राज ठाकरे म्हणाले की, हा खूप विचित्र विषय आहे. कारण काय नेमकं तुम्ही दाखवणार आहात आणि त्याचा संबंध हा त्या सीरिजशी आहे की नाही, यावर सगळं अवलंबून आहे. मध्यंतरी माझ्या मित्राने एक सीरिज लावली होती. त्यात व्याकरणापुरतं मराठी होतं. बाकी बऱ्याचशा शिव्याच होत्या.
'बंधनं आणूही नये. पण...'ते पुढे म्हणाले की, तुम्ही किती शिव्या द्यायच्या. शेवटी आपण परदेशातील बऱ्याच गोष्टींचं अनुकरण करतो. परंतु इतक्या वर्षांनंतरही आपल्याकडे अजूनही लोकशाही रुजायची आहे. त्याच्यामुळे तो मोकळेपणा आणला पाहिजे की नाही, अशातला भाग नाही. मी कुठल्याही बंधनात रमणारा माणूस नाही. त्यामुळे बंधनं आणूही नये. पण जर त्या चित्रपटाची किंवा सीरिजची गरज असेल तर तिथे कोणतेही बंधन येता कामा नये.