Join us  

कापूस वेचून दिवस काढले,'पंचायत'ने बदललं आयुष्य; बिनोदचा जीवनप्रवास वाचून डोळ्यात येईल पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 2:16 PM

बहुचर्चित 'पंचायत' या वेबसिरीजचा तिसरा सीझन प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे.

Ashok Pathak Success Story : बहुचर्चित 'पंचायत' या वेबसिरीजचा तिसरा सीझन प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे. या सिरीजप्रमाणे त्यातील पात्रंही चाहत्यांची मनं जिंकत आहे. पण त्यातील 'देख रहा हैं बिनोद' हा डायलॉग तुम्हाला आठवतोय का? अभिनेता अशोक पाठकने या वेबसिरीजमध्ये बिनोद नावाचं पात्र साकारलं आहे. या पात्राला चाहत्यांकडून प्रचंड प्रेम मिळालं. 

बिनोद नावाचं पात्र साकारुन अशोक पाठकला नवी ओळख मिळाली. तसेच या पात्रातील त्याचा साधेपणा पाहून प्रेक्षकांकडून त्याच्या अभिनयाला प्रचंड दाद मिळाली. पण अशोकचा इथपर्यंतचा प्रवास प्रचंड संघर्षाने भरलेला तसेच नवख्या कलाकारांना प्रेरणा देणारा आहे.

पार्श्वभूमी-

बिहारमधील सिवान हे अशोकचं मुळ गाव आहे. हाती उत्पन्नाचं साधन नसल्यामुळे उदरनिर्वाहासाठी त्याचं अख्खं कुटुंब  हरियाणातील फरिदाबाद येथे स्थलांतरित झालं. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत अशोकचं बालपण गेलं. गरिबी जणू त्यांच्या पाचवीलाच पुजलेली होती. अभिनेता लहान असताना त्याचे काका कापूस वेचायला जात असतं. त्यांना मदत म्हणून लहानगा अशोकही सायकलवर कापसाचे गठ्ठे एकत्रित करून परगावी विकण्यासाठी जायचा. या कामाचे त्याला प्रतिदिन १०० रुपये मिळायचे. या कमाईतून त्याने एके दिवशी थिएटरमध्ये पहिल्यांदा चित्रपट पहिला. त्यातून त्याची अभिनयाप्रती रुची वाढू लागली. 

अभिनय क्षेत्रातील प्रवास-

खऱ्या अर्थाने महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अशोकच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. आपले बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर अशोक पाठकचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. वेगवेगळ्या प्रकारच्या गायन तसेच नाटकांमध्ये तो काम करायचा. कॉलेमधील क्लचरल फेस्ट असो किंवा थिएटर प्ले त्यामध्ये तो उत्साहाने भाग घ्यायचा.दरम्यानच्या काळात अभिनेत्याच्या मनात सिनेमात काम करण्याची आवड निर्माण होऊ लागली. 

एकदा कॉलेज फेस्टिव्हलच्या एका नाटकामध्ये काम करून अशोकला ४० हजार रुपये मिळाले होते. त्याच पैशातून मुंबई गाठत अभिनेत्याने वेगवेगळ्या ठिकाणी ऑडिशन्स दिल्या.  छोट्या छोट्या भूमिका वठवून हाती मिळेल ते काम त्याने केलं. 

अशातच अशोक पाठकला पंचायत सिरीजच्या पहिल्या सिझनची ऑफर आली. पण सुरुवातीला पंचायतमध्ये काम करण्यास त्याने नकार दिला होता. त्यानंतर एका मित्राच्या सल्ल्याने त्याने ही भूमिका साकारली आणि तो अल्पावधीतच प्रसिद्ध झाला. 

वर्कफ्रंट-

अशोकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर त्याने, ‘सेक्रेड गेम्स’, ‘पंचायत’,’ आर्या’, ‘शंघाई’, ‘हाईवे’ और ‘क्लास ऑफ ८३’ सह  ‘फुकरे रिटर्न्स’ यांसारख्या अनेक चित्रपट आणि वेबसिरीजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

टॅग्स :बॉलिवूडवेबसीरिजसेलिब्रिटीप्रेरणादायक गोष्टी