बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते मनोज बाजपेयी त्यांच्या 'द फॅमिली मॅन' या वेब सीरिजमुळे नेहमीच चर्चेत असतात. अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रीलिज झालेल्या 'द फॅमिली मॅन' या वेब सीरिजला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. 'द फॅमिली मॅन' सीरिजचे दोन भाग प्रदर्शित झाले असून प्रेक्षक आतुरतेनं तिसऱ्या भागाची वाट बघत आहेत. या वेब सीरिजशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
नुकतेच Amazon Prime Video द्वारे एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि काही बहुप्रतिक्षित वेब सिरीज आणि चित्रपटांची घोषणा करण्यात आली. पण, Amazon Prime Video ने The Family Man 3 बद्दल सर्वकाही लपवून ठेवलं. त्यामुळे फॅमिली मॅन ३ येणार की नाही याबद्दल चाहत्यांना प्रश्न पडले आहेत. पण, चाहत्यांना चिंता करण्याची गरज नाही. मनोज बाजपेयी यांनी द लॅलनटॉपला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, 'याच वर्षी शूटिंग सुरू होईल. शोचा पुढचा सीझन हा पहिल्या दोन्ही सिझनपेक्षा मोठा असणार आहे'. हे सांगून मनोज यांनी चाहत्यांच्या उत्साहात भर घातली.
द फॅमिली मॅन 3 खरंच येणार आहे. परंतु रिलीजची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. 'फॅमिली मॅन सीझन २' चा प्रीमियर २०२२ मध्ये आयोजित करण्यात आला होता, त्याला चाहत्यांची चांगली पसंती मिळाली. 'द फॅमिली मॅन'च्या पहिल्या सीझनमध्ये मनोज यांनी दहशतवाद्यांशी लढा दिला होता. तर दुसऱ्या सीझनमध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथाचे अॅक्शन सीन्स चाहत्यांना पाहायला मिळाले. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ सिरीजच्या दुसऱ्या भागाच्या शेवटी, यावेळी श्रीकांत कोरोनासारख्या महामारीचा सामना करताना पाहायला मिळेल असे संकेत देण्यात आले होते. त्यामुळे येणाऱ्या तिसऱ्या भागात काय पाहायला मिळेल, कोणती कथा असेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.