Join us

अमेय वाघचं नशीब उजळलं! 'असूर'नंतर मिळाली नेटफ्लिक्सची वेब सीरिज, दिसणार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 15:18 IST

अमेय पुन्हा एकदा नव्या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'असूर'नंतर अमेय नेटफ्लिक्सच्या सीरिजमध्ये झळकणार आहे.

दमदार अभिनयाच्या जोरावर अभिनेता अमेय वाघने अल्पावधीतच मराठी कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. नाटक, मालिका आणि अनेक लोकप्रिय सिनेमांमध्ये काम केलेला अमेय दिल दोस्ती दुनियादारी मालिकेतून घराघरात पोहोचला. 'फास्टर फेणे', 'मी वसंतराव', 'गर्लफ्रेंड', 'अनन्या', 'धुरळा' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांत तो झळकला. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या असूर या वेब सीरिजच्या दुसऱ्या पर्वात अमेय दिसला होता. या सीरिजमधील त्याच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं होतं. 

आता अमेय पुन्हा एकदा नव्या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. असूरनंतर अमेय नेटफ्लिक्सच्या सीरिजमध्ये झळकणार आहे. नुकतंच याबाबत त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. 'काला पानी' असं अमेयच्या नव्या वेब सीरिजचं नाव आहे. या वेब सीरिजमध्ये अमेय पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. १८ ऑक्टोबरला ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. अमेयच्या या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटींनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

'काला पानी' वेब सीरिजमध्ये अमेयबरोबरच मोना सिंह, आशुतोष गोवारीकर, सुकांत गोएल, आरुषी शर्मा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. दरम्यान, अमेय असूरच्या सीरिजच्या पहिल्या भागातही दिसला होता. त्याने 'द ग्रेट इंडियन मर्डर', 'कारटेल' या वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.

टॅग्स :अमेय वाघमराठी अभिनेता