Join us  

Exclusive: परभणीत सेट, 'समिंद्री'चा लूक अन् बरंच काही! सईने सांगितला 'मानवत मर्डर्स' च्या शूटिंगचा भन्नाट अनुभव

By देवेंद्र जाधव | Published: September 18, 2024 5:45 PM

सई ताम्हणकरने 'मानवत मर्डर्स' शूटींगनिमित्ताने तिला आलेला शूटींगचा खास अनुभव सर्वांसोबत शेअर केलाय (sai tamhankar)

आशिष बेंडे दिग्दर्शित बहुचर्चित 'मानवत मर्डर' ही वेबसीरिज ४ ऑक्टोबरला सोनी लिव्ह या ओटीटीवर रिलीज होतेय. या वेबसीरिजमध्ये मराठीमधील सुपरस्टार अभिनेत्री सई ताम्हणकर समिंद्री ही भूमिका साकारत आहे. त्यानिमित्ताने सईने लोकमत फिल्मीशी केलेली exclusive बातचीत

>>> देवेंद्र जाधव

'मानवत मर्डर'मधील भूमिकेची ऑफर स्वीकारताना काय भावना होत्या?

या वेबसीरिजचे दिग्दर्शक आशिष बेंडे माझे मित्र आहेत. त्यांनी मला या वेबसीरिजमध्ये काम करण्याची ऑफर दिली. आशिष मित्र असल्याने मला त्याच्याबरोबर काम करायचं होतं. त्यामुळे मी होकार दिला. एखादी भूमिका झेपेल का, असा विचार माझ्या मनात येतो तेव्हा पटकन मी होकार देते. कारण त्यानिमित्ताने आपण जास्त तयारी करतो. वेगळं काहीतरी करायला मिळतं. 

 वेबसीरिजमधील भाषेसाठी कशी मेहनत घेण्यात आली?

भाषेवर खूप मेहनत घ्यावी लागली. खूप वेगळी भाषा आहे. मी ही भाषा कधी ऐकली नव्हती आणि बोललेही नव्हते. खऱ्या आयुष्यात आणि मोठ्या पडद्यावर कधीच या भाषेचा संबंध आला नाही. त्यामुळे नवीन काहीतरी  शिकायला मिळणं, त्याची धाकधूक असणं आणि ते नीटच व्हावं यासाठी जास्त प्रयत्न करणं, ही प्रोसेस खूप आवडते मला. त्यामुळे मला खूप आनंद मिळाला.

समिंद्रीचा लूक झाल्यावर काय अनुभव होता?

लूकबद्दल सांगायचं तर, मला जेव्हा टॅटू लावण्यात आले, याशिवाय मी जे दागिने घातले तेव्हा काहीतरी वेगळंच वाटत होतं. कारण ते कॅरी करायला मजा आली. आऊटफिट कसाही असो, तो कॅरी कसा केला जातोय हे खूप महत्वाचं असतं. आणि त्यानिमित्ताने मला कळलं की, मी अजून कोणत्या साच्यात छान दिसतेय. याशिवाय अशा वेगळ्या कॅरेक्टरमध्ये मी फिट बसतेय का याचाही मला अंदाज आला. आणि हे सर्व लोकांना आवडतंय हे पाहून खूप मजा आली.

माथेफिरु व्यक्तीची भूमिका करताना स्वतःची मानसिक काळजी कशी घेतलीस?

खूप चांगला प्रश्न आहे. कारण माथेफिरु माणसाची भूमिका करताना स्वतःशी जोडलेलं असणं खूप गरजेचं असतं. मी खूप इमोशनल असल्याने मला अशावेळी विशेष काळजी घ्यावी लागते. शूटींग करताना आपलं प्रोफेशनल आयुष्य आहे आणि आपण पर्सनल आयुष्यात वेगळे आहोत याचा रोज एक डोस घेतला तर आयुष्य सोप्पं होतं. आयुष्य जगताना आणि अभिनय करताना ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याचा मी जास्त ताण घेत नाही. याप्रकारे मी माझा मानसिक समतोल साधण्याचा प्रयत्न करते.

शूटींग करताना अनुभव कसा होता?

ही भूमिका जगताना किंवा अशा एका कलाकृतीशी स्वतःला जोडून घेणं हे खूप अस्वस्थ करणारं आहे. परंतु दिग्दर्शकाने वापरलेल्या युक्त्या आणि क्लुप्त्या विलक्षण आहेत. याचं सगळं श्रेय आशिषला आहे. उदाहरणार्थ वेबसीरिजमध्ये एक शॉट आहे की, एका मुलीला अचानक पळवलं जातं आणि मागून एक कुऱ्हाड दिसते. याशिवाय एका बाईच्या कपाळात कुऱ्हाड घुसण्याचा एक प्रसंग आहे. हे दाखवणं खूप चॅलेंजिंग होतं. अशावेळेला तुमची टीम भारी असणं गरजेचं आहे.

शूटींग करताना एखादा धडकी भरवणारा अनुभव?

आपण जेव्हा हे कॅरेक्टर स्वीकारलंय तेव्हाच मला धडकी भरली. समिंद्री आणि माझ्यात काहीच साम्य नाहीय. समिंद्री हे पहिलं कॅरेक्टर आहे ज्याने माणूस म्हणून काहीच दिलं नाही मला, फक्त माझ्याकडून घेतलं. समिंद्रीची भूमिका साकारणं हाच धडकी भरवणारा अनुभव होता. कधीकधी समिंद्री जे करते ते माणूस म्हणून आपल्याला पटत नसतं. पण इथेच कलाकाराचा कस लागतो. त्यामुळे मी इमोशनली जवळ जाण्याचा प्रयत्न करते. बाकी, मी अभिनेत्री असल्यामुळे मला रक्त कसं तयार करतात? रक्त पातळ होण्यासाठी काय वापरतात? या टेक्निकल गोष्टी मला माहित आहेत.

शूटींग लोकेशन आणि सेटवरचा अनुभव कसा होता?

परभणी गावात शूटींग झालंय. मी जेव्हा समिंद्रीचा लूक कॅरी करुन तयार होऊन बाहेर आले तेव्हा मला लोक ओळखत नव्हते. आमचेच काही मित्र सेटवर होते. पण मी त्यांच्या समोरुन गेले तरीही त्यांनी मला ओळखलं नाही. त्यामुळे मला बरं वाटलं की आपला लूक एकदम मातीतला झालाय. आणि चांगला झालाय.

टॅग्स :सई ताम्हणकरवेबसीरिज