सध्या कलाविश्वात आणि सोशल मीडियावर पंचायत 3 या वेबसीरिजची जोरदार चर्चा आहे. अनेकांनी ही सीरिज पाहिली असेल किंवा काहींनी पाहिलीदेखील नसेल परंतु, त्यातील एक संवाद चांगलाच गाजतोय. 'मन कुछ अच्छा नहीं लग रहा', हा डायलॉग सध्या अनेकांच्या ओठी ऐकू येत आहे. या सीनमध्ये झळकलेल्या अम्माजीने नेटकऱ्यांच्या मनात जागा निर्माण केली आहे. या सीरिजमध्ये अम्माजीची भूमिका अभिनेत्री आभा शर्मा यांनी साकारली असून सध्या त्या चर्चेत येत आहेत.
आभा यांनी इंडस्ट्रीत येण्यापूर्वी बराच स्ट्रगल केला. इतकंच नाही तर त्यांना अनेक गंभीर आजारांचाही सामना करावा लागला. अलिकडेच त्यांनी 'इंडियन एक्स्प्रेस'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांच्या फिल्मी करिअर आणि पर्सनल आयुष्यावर भाष्य केलं.
"मला लहानपणापासून अभिनेत्री व्हायचं होतं पण माझ्या आईचा याला विरोध होता. तिला या क्षेत्रात काम करणं मान्य नव्हतं. आणि, मला आईच्या विरोधात जायचं नव्हतं. माझं कुटुंब शिक्षित होतं पण त्यांची विचारसरणी जुन्या पद्धतीची होती. माझ्या आईच्या निधनानंतर मी पुन्हा अभिनय करायला सुरुवात केली", असं आभा मिश्रा म्हणाल्या.
पुढे त्या म्हणतात, "माझे वडील टेलीकॉम कंपनीत काम करायचे. परंतु, आईच्या निधनानंतर मी सगळ्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली आणि कधीच लग्न केलं नाही. वयाच्या ३५ व्या वर्षी माझ्या हिरड्यांमध्ये इन्फेक्शन झालं होतं ज्यामुळे माझे सगळे दात काढावे लागले. इतकंच नाही तर वयाच्या ४५ व्या वर्षी मला एक रेअर आजार झाला होता ज्यामुळे माझे हातपाय सतत थरथर कापायचे."
दरम्यान, १९९१ मध्ये आभा यांनी अर्ध्यावर शिक्षण सोडलं. त्यानंतर त्यांनी लखनौमध्ये नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू करत त्या मुंबईत पोहोचल्या आणि इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. यापूर्वी त्यांनी परिणिती चोप्रा आणि अर्जुन कपूर यांच्या 'इश्कजादे' या सिनेमातही काम केलं आहे.