Panchayat 3 : गेल्या कित्येक दिवसांपासून चाहते वाट बघत असलेल्या 'पंचायत' या गाजलेल्या वेब सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'पंचायत २'नंतर या सीरिजच्या पुढील भागाच्या प्रेक्षक प्रतिक्षेत होते. काही दिवसांपूर्वीच 'पंचायत ३' बाबत घोषणा करण्यात आली होती. या वेब सीरिजच्या तिसऱ्या भागाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली होती. अखेर मंगळवारी(२८ मे) 'पंचायत ३' सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. पण, 'पंचायत ३' रिलीज होताच वेब सीरिजच्या मेकर्सला मोठा धक्का बसला आहे.
ओटीटीवरील 'पंचायत' ही सर्वाधिक लोकप्रियता मिळालेल्या सीरिजपैकी एक आहे. ३ एप्रिल २०२० ला 'पंचायत'चा पहिला सीझन प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर प्रेक्षकांकडून मिळालेला प्रतिसाद पाहून २० मे २०२२ रोजी 'पंचायत २' प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर 'पंचायत ३'साठी प्रेक्षक उत्सुक होते. नुकतंच अॅमेझॉन प्राइमवर पंचायतचा तिसरा सीझन प्रदर्शित करण्यात आला. पण, प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच 'पंचायत ३' वेब सीरिज ऑनलाईन लीक झाली आहे. त्यामुळे मेकर्सची चिंता वाढली आहे. तमिळरॉकर्स, टेलिग्राम, MovieRulz यांसारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर 'पंचायत ३' वेब सीरिज लीक झाली आहे.
'पंचायत' वेब सीरिजमधून गावागावातील राजकारणाची हलकीफुलकी कथा मांडण्यात आली होती. फुलेरा गावात सचिव म्हणून आलेला अभिषेक त्रिपाठी प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस उतरला होता. 'पंचायत'मध्ये अभिनेता जितेंद्र कुमारने अभिषेक त्रिपाठीची भूमिका साकारली. तर रघूवीर यादव, नीना गुप्ता यांच्या प्रमुख भूमिका होत्या. दुसऱ्या सीझनमध्ये शेवटचा भाग प्रेक्षकांना रडवून गेला. आता 'पंचायत 3' मध्ये फुलेरा पंचायतीमध्ये नवीन सचिव कोण होणार, याची रंजक कहाणी बघायला मिळणार आहे. 'पंचायत ३' मध्ये जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुवीर यादव यांच्यासह सुनिता राजवार, पंकज झा, सानविका, चंदन रॉय यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.