Join us  

ना कुणी मोठा स्टार, ना मोठं बजेट; तरीही 'गाववाल्यां'च्या वेब सीरिजनं खाऊन टाकलं OTT चं मार्केट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 3:22 PM

२०२४ च्या मोस्ट वॉच वेबसीरिजमध्ये गावातील मातीशी जोडलेल्या एका वेबसीरिजने अव्वल क्रमांक पटकावला आहे. ही वेबसीरिज तुम्ही पाहिली नसेल तर नक्की बघा.

सध्या वेबसीरिजचं प्रमाण डिजिटल माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. अनेक OTT माध्यमांमध्ये विविध विषयांवर आधारीत वेबसीरिज चांगल्याच गाजत आहेत. अशातच सध्या एका वेबसीरिजने प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळवली. इतकंच नव्हे कोणताही मोठा स्टार किंवा लोकप्रिय अभिनेत्री नसूनही या वेबसीरिजने २०२४ मधील  most watched Indian show च्या यादीत अव्वल क्रमांक पटकावला आहे. ही वेबसीरिज दुसरी तिसरी कोणती नसून ती आहे 'पंचायत ३'.

'पंचायत ३' ठरली सर्वाधिक बघितली जाणारी वेबसीरिज

Ormax मीडियने दिलेल्या रिपोर्टनुसार, 'पंचायत ३' ही २०२४ वरील ओटीटीवर सर्वाधिक बघितली जाणारी वेबसीरिज ठरली आहे. २०२४ च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये 'पंचायत ३' ही सर्वाधिक बघितली जाणारी वेबसीरिज ठरली आहे. प्राईम व्हिडीओवर 'पंचायत ३' ला २८.२ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. 'पंचायत ३' ने नेटफ्लिक्सवरील मल्टिस्टारर आणि बिग बजेट वेबसीरिज 'हिरामंडी'लाही मागे टाकलंय. 'हिरामंडी'ने २०.३ मिलियन व्हूज मिळवत या यादीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. 

 

बिग बजेट वेबसीरिजला 'पंचायत ३'ने टाकलं मागे

'हिरामंडी' वेबसीरिजचं दिग्दर्शन संजय लीला भन्साली यांनी केलं. तर 'पंचायत ३'चं दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा यांनी केलं. २५० कोटींमध्ये हिरामंडी वेबसीरिजची निर्मिती करण्यात आली होती. तर 'पंचायत ३' वेबसीरिजचं बजेट ८० ते ९० कोटी असल्याचं सांगण्यात येतं. तरीही कमी बजेटमध्येही 'पंचायत ३' वेबसीरिजने अव्वल क्रमांक पटकावला आहे. या यादीत तिसऱ्या नंबरवर रोहित शेट्टीची 'इंडियन पोलीस फोर्स' ही वेबसीरिज आहे तर चौथ्या नंबरवर 'बिग बॉस ओटीटी 3' दिसून येतं. 

'पंचायत ३' वेबसीरिजविषयी

'पंचायत' वेब सीरिजमधून फुलेरा गावातील राजकारणाची हलकीफुलकी कथा दिसली. आधीच्या दोन्ही सीझनप्रमाणे तिसऱ्या सीझनलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 'पंचायत ३'मध्ये अभिनेता जितेंद्र कुमारने अभिषेक त्रिपाठीची भूमिका साकारली. तर रघूवीर यादव, नीना गुप्ता यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या प्रमुख कलाकारांसह सुनिता राजवार, पंकज झा, सानविका, चंदन रॉय यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

टॅग्स :संजय लीला भन्साळीवेबसीरिज