Join us

लिखाणासाठी घेतले ५ कोटी? आमिर खानकडून मोठी ऑफर? अखेर 'पंचायत'च्या लेखकाने मौन सोडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2024 5:48 PM

पंचायत 3 च्या लेखकाने लिखाणासाठी ५ कोटी मानधन घेतलं आहे का? अशा अनेक चर्चांवर स्पष्ट खुलासा केलाय (panchayat 3, chandan kumar)

सध्या 'पंचायत 3' वेबसिरीज चांगलीच गाजतेय. इमोशन्स आणि कॉमेडीचा तडका असलेल्या या वेबसिरीजचा तिसरा सीझन सुद्धा  चांगलाच लोकप्रिय झाला. फुलेरा आणि गावातील सचिवजी, प्रधानजी, विकास, प्रल्हाद, विधायक, भूषण या सर्वांची गोष्ट प्रेक्षकांना चांगलीच भावली. अशातच गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा सुरु आहे, ती म्हणजे 'पंचायत 3' लिहिण्यासाठी लेखकाने तब्बल ५ कोटींचं मानधन घेतलं. याशिवाय आमिर खानने लेखकाला मोठी ऑफर दिली आहे. या सर्व चर्चांवर 'पंचायत'चा लेखक चंदन कुमारने मौन सोडलंय. 

'पंचायत'च्या लिखाणासाठी खरंच ५ कोटी घेतले?

'पंचायत'चा लेखक चंदन कुमारने 'पंचायत' शो लिहिण्यासाठी ५ कोटी रुपये फी घेतल्याची चर्चा आहे. याबाबत बोलताना लेखक चंदन कुमारने डिजीटल कॉमेंट्री या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, "या सर्व बनावट चर्चा आणि कल्पना आहेत. त्यांना काही अर्थ नाही. अर्थात या कल्पना खरंच प्रत्यक्षात उतरल्या असत्या तर मजा आली असती."

आमिर खानकडून फोन यशराज फिल्म्स् कडून ऑफर?

गेल्या काही दिवसांपासून रिपोर्ट्सनुसार असेही सांगितले जात होते की, 'पंचायत'चा लेखक चंदन रॉयला आमिर खान आणि यशराज प्रॉडक्शनकडूनही ऑफर आली. यावर लेखक म्हणाला, 'आमिर खानचा थेट फोन आला नाही. प्रॉडक्शन हाऊसकडून फोन येतात. भेटीगाठी आणि संवाद होतच राहतात. मलाही त्यांच्यासोबत काम करायचं आहे, म्हणून जेव्हा जेव्हा मला फोन येतो तेव्हा मी एक कथा लिहितो. कथा अशा मोठ्या प्रॉडक्शन हाऊसला पिच करणे आणि ती प्रत्यक्षात उतरणे यात खूप फरक आहे."

सीरिज लिहिणाऱ्या लेखकांना पगार किती मिळतो?

लेखकांच्या पगाराबद्दल बोलताना चंदन कुमार म्हणाला, "तुम्ही स्वत: एखाद्या स्टुडिओशी जोडले जाता तेव्हा तुम्हाला एक रक्कम दिली जाते. त्याचप्रमाणे, जर तुम्ही स्वतंत्र लेखक म्हणून सुरुवात केली आणि निर्मात्यांना कथा सांगितल्या तर तुमचा पगार कमी होतो. तुमची कथा किती मजबूत आहे आणि तुम्ही निर्मात्यांना किती चांगल्या पद्धतीने पटवून देऊ शकता, यावरही तुम्हाला किती पैसे मिळतात हे अवलंबून आहे. त्यामुळे लेखकांचं मानधन 10 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. याशिवाय हे मानधन विविध घटकांवर अवलंबून असून यात कमी जास्त वाढ होऊ शकते."

टॅग्स :जितेंद्रपंचायत समिती