'पंचायत' वेबसीरिज (panchayat) चांगलीच गाजली. या सीरिजचे तीनही सीझन लोकांच्या पसंतीस उतरले. ग्रामीण भागात फुलणारी हलकीफुलकी कहाणी म्हणून 'पंचायत'वेबसीरिज नावाजली गेली. या वेबसीरिजमधील प्रत्येक व्यक्तिरेखेने लोकांच्या मनात छाप पाडली. सीरिजमधील असंच एक गाजलेलं कॅरेक्टर म्हणजे बनराकस. प्रधान, सचिव यांना त्रास देणारा भूषण उर्फ बनराकसची भूमिका साकारली अभिनेता दुर्गेश कुमारने (durgesh kumar). परंतु सीरिज सुपरहिट होऊनही काम न मिळाल्याची खंत दुर्गेशने व्यक्त केलीय.'भूषण'ने व्यक्त केली खंत, म्हणाला-"पंचायतच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सीझनमध्ये भूषणच्या भूमिकेतून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला अभिनेता दुर्गेश कुमारने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "खूप कठीण काळ आहे. लोकांना पंचायत सीरिज किती यशस्वी झाली हे दिसतं परंतु २५ वर्षांनंतरही माझा स्ट्रगल तसाच आहे. सीरिज लोकप्रिय होऊनही गेल्या दीड वर्षांपासून मला कोणत्याही मोठ्या प्रोडक्शन हाऊसकडून ऑडिशनसाठी फोन आला नाहीये. मी छोट्या निर्मात्यांसोबत काम करतो, जे माझ्या प्रतिभेला जाणतात.""इंडस्ट्री मला माझ्या कामामुळे ओळखते. परंतु आजही मला ऑडिशनसाठी कास्टिंग डायरेक्टर्सच्या मागे पळावं लागतं. हायवे आणि पंचायतनंतरही कोणत्याही मोठ्या प्रॉडक्शन हाऊसकडून प्रमुख भूमिकेसाठी मला विचारणा झाली नाही. सर्वजण मला ओळखतात परंतु तरीही मला मोठी ऑफर मिळाली नाहीये. मी सातत्याने ऑडिशन देत आहे. याशिवाय काही भूमिकांसाठी माझी निवडही होते. परंतु हे सर्व अनपेक्षित आहे.""पंचायत वेबसीरिजला अनेक पुरस्कार मिळाले परंतु आजही समीक्षकांना माझं नाव माहित नाही. २५ वर्ष इंडस्ट्रीत काम करत असूनही मला हवं तसं श्रेय मिळालं नाही. या कौतुकास मी पात्र आहे. मात्र प्रेक्षकांनी माझ्या कामाचं कौतुक केलं याचा मला खूप आनंद आहे."