Join us

Video: प्रशांत दामले यांचं OTT वर दमदार पदार्पण; पहिल्यांदाच दिसणार वेब सीरिजमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 10:40 AM

Prashant damle: ‘एका काळेचे मणी’ या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रशांत दामले ओटीटीवर पदार्पण करत आहेत.

रंगमंचावरील हुकमी एक्का म्हणजे प्रशांत दामले (prashant damle). आजवरच्या कारकिर्दीत प्रशांत दामले यांनी एकापेक्षा एक अप्रतिम नाटकं कलाविश्वाला दिली आहे. आजही त्यांची नाटकं पाहायला प्रेक्षक तोबा गर्दी करतात. विशेष म्हणजे रंगमंच, रुपेरी पडदा गाजवल्यानंतर प्रशांत दामले ओटीटीवर पदार्पण करण्यास सज्ज झाले आहेत. लवकरच ते एका नव्या कोऱ्या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

 ‘एका काळेचे मणी’ या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रशांत दामले ओटीटीवर पदार्पण करत आहेत. या सीरिजमध्ये त्यांच्यासोबत विशाखा सुभेदार, समीर चौघुले, हृता दुर्गुळे अशी स्टारकास्ट झळकणार आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमधून ही वेब सीरिज हलकीफुलकी आणि विनोदी असल्याचं लक्षात येत आहे.

प्रशांत दामले साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

एका काळेचे मणी ही सीरिज जिओ सिनेमावर रिलीज होणार आहे. या सीरिजमध्ये दोन पिढ्यांमधील संघर्ष विनोदी पद्धतीने दाखविण्यात आला आहे. तसंच मध्यमवर्गीय मुल्यांचं पालन करणारे पालक, बदलत्या काळानुसार मुलांची जीवनशैली यावर ही सीरिज भाष्य करणार आहे.

काय आहे या सीरिजची कथा

एका काळेची मणी ही सीरिज एका मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती फिरते. या सीरिजमध्ये प्रशांत दामले वडिलांच्या भुमिकेत आहेत. तसंच हृता दुर्गुळे त्यांच्या लेकीची भूमिका साकारणार आहे. पाळीव प्राण्यांसाठी कपड्यांचा ब्रॅन्ड तयार करणे हे तिचे स्वप्न आहे. तर त्यांचा मुलगा आयर्लंडमध्ये पीएचडीचे शिक्षण घेत आहे आणि त्यानंतर पुन्हा भारतात येण्याचा त्याचा मानस आहे. यामध्येच त्यांची आई मुलांच्या लग्नाच्या चिंतेने त्रस्त आहे. 

दरम्यान, या वेब सीरिजची निर्मिती महेश मांजरेकर, ऋतुराज शिंदे, ऋषी मनोहर यांनी केलं आहे. तर, दिग्दर्शन अतुल केळकर यांनी केलं आहे.  या वेबसीरिजमध्ये प्रशांत दामलेंबरोबरच ऋता दुर्गुळे (hruta durgule), समीर चौघुले (samir choughule),पौर्णिमा मनोहर, विशाखा सुभेदार (vishakha subhedar), दत्तू मोरे (datta more) आणि वंदना गुप्ते (vandana gupte) हे कलाकार स्क्रीन शेअर करणार आहेत.

टॅग्स :प्रशांत दामलेसमीर चौगुलेमहेश मांजरेकर वेबसीरिजनाटक