कलाकार - तेजस्विनी पंडित, प्राजक्ता माळी, मोहन आगाशे, मोहन जोशी, मकरंद अनासपुरे, सचिन खेडेकर, उर्मिला कोठारे, वैभव मांगले, अनंत जोग, अभिजित पानसे, गिरीश दातार, निलेश दिवेकर, श्रेयस राजे, अतुल काळे, वनिता खरात आणि माधुरी पवारदिग्दर्शक - अभिजित पानसेस्टार - ४ स्टारपरिक्षण - चित्राली चोगले-आणावकर
राजकारण, वेश्याव्यवसाय आणि त्यात गुरफटत जाणारी पण तितकीच रंजक वळणं घेणारी 'रानबाजार'ची कथाच सुरु होते ते एका खुनापासून, हा खून साधासुधा नाही तर लवकरच महाराष्ट्रात होऊ घातलेल्या मुख्यमंत्र्यांचा असतो. या खुनाने राजकीय वर्तुळात खळबळ माजते. पण त्याचसोबत एक वेगळी हालचाल सुरू होते ती वेश्या व्यवसायात. आयेशा सिंग (तेजस्विनी पंडित) आणि रत्ना (प्राजक्ता माळी ) या दोन वेगळ्या स्तरातील देहविक्री करणाऱ्या महिला आणि त्या दोघींसोबत सुरू होणारी ही अतिशय वेगळी पण नंतर वेगळ्याच टप्प्यावर जाणारी गोष्ट. या दोघी, तो खून आणि त्यांची पुढे होणारी फरफट, त्यात राजकीय वर्तुळातले घाणेरडे खेळ आणि सत्तेचं राजकारण आणि रंगत जाते 'रानबाजार'(RaanBaazar).
आता हा खून कोणी केला? तो कशासाठी केला? त्याचे पुढे परिणाम काय होतात? यातून निष्पन्न काय होतं आणि त्याचा शेवट काय होतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी घडतो तो या बेधडक वेबसिरीझच्या मनोरंजक, थ्रीलिंग आणि तितक्याच उत्सुकता वाढवणाऱ्या १० एपिसोड्सचा प्रवास. आणि हा प्रवास खरंच अनुभवण्यासारखा आहे. पाहताना त्या कथेत आपण गुंतत तर जातोच पण त्यात मिळणारे आश्चर्याचे धक्के पुढे काय घडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचवतात. प्रत्येक एपिसोडच्या शेवटाला एक असा आश्चर्याचा धक्का मिळतो जेणेकरून कथा वेगळ्याच वळणावर जाऊन पोचते.
'रानबाजार'ची कथा, त्याची बांधणी, अभिजित पानसे यांचं दिग्दर्शन तर उत्तम आहेच पण यात अजून एक भक्कम जमेची बाजू म्हणजे वेब सीरिजचं कास्टिंग आणि प्रत्येक कलाकारांनं केलेलं चोख काम. छोट्यात छोटी भूमिका लक्षात राहते. तेजस्विनी पंडित हिचे काम तर छान आहेच पण प्राजक्ता माळी ही भाव खाऊन जाते. सोबत नवोदित माधुरी पवार सुद्धा छाप पाडून जाते. मोहन आगाशे यांचा अनुभव आणि अभिनय यांची सांगड अगदी उत्तम जमून आली आहे. दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी साकारलेला मोकाशी सुद्धा अगदी बारीक प्रसंगात देखील अधोरेखित होतो. प्रभाकर मोरे यांचा एपिसोड आणि त्यांनी निभावलेला एक सीन अजिबात चुकवून चालणार नाही. अगदी काही वेळासाठी मोरे स्क्रीनवर दिसतात पण तो सीन फक्त त्यांचाच आहे आणि त्यामुळे मिळणारा एक ब्रेक वेगळं काम करुन जातो. या व्यतिरिक्त मकरंद अनासपुरे अनंत जोग, वैभव मांगले, सचिन खेडेकर, उर्मिला कोठारे, इत्यादी. कलाकार त्या त्या सीन साठी त्या त्या भूमिकेसाठी जे अपेक्षित आहे ते योग्य पद्धतीत देऊन जातात.
जरा काही भूतकाळ आणि वर्तमान यातले प्रसंग पाहताना थोडी गल्लत होऊ शकते. काहीसा गोंधळ होऊ शकतो पण त्यातही नीट लक्ष देऊन पाहिलं तर कथा तुम्हाला पुन्हा मार्गावर आणते. शेवटचा एपिसोड मात्र अगदी लक्षपूर्वक पाहायला हवा त्यातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मोठे संदर्भ लक्षात येतात. इतकेच नाही तर शेवटच्या एपिसोडला एक मोठा ट्विस्ट सुद्धा आहे. त्यामुळे शेवटचे काही एपिसोड्स बरंच काही एका वेळी देऊन जातात. त्यामुळे त्याकडे विशेष लक्ष देऊन पाहायला हवं. संहितेची गरज म्हणून कथा बोल्ड नक्कीच आहे त्याचसोबत शिव्या सुद्धा योग्य ठिकाणी पात्राची गरज म्हणून तोंडातून येतात त्याचा भडीमार अजिबात होत नाही.
थोडक्यात सांगायचं झालं तर, त्या दोघींमुळे राजकारणात आलेल्या वादळाची ही गोष्ट नक्कीच पाहण्यासारखी आहे आणि तितकीच रंजक सुद्धा. प्राजक्ताच्या अभिनयासाठी, अभिजीत पानसेच्या दिग्दर्शनासाठी, बेधडक-वेगळ्या कथेसाठी आणि एका मनोरंजक अनुभवासाठी नक्कीच पाहा 'रानबाजार...'